- चंद्रशेखर जोशी.पैसा जमविणे हे ध्येय न ठेवता लौकीक मिळविणे, आलेल्या व्यक्तीस न्याय कसा मिळेल हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वकीली क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये अत्रे कुटुंबियांची एक आगळी वेगळी ओळख आहे. एक दोन नव्हे तर तब्बल चार पिढ्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. वामनराव रंगराव अत्रे या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने १९२३ मध्ये आपल्या वकीली व्यवसायास प्रारंभ केला. त्या काळात ‘काकासाहेब अत्रे’ हे नाव आदराने घेतले जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या हिंदू महासभेचे काम काकासाहेब अत्रे यांनी वाढविले. सामाजिक कार्य करत असताना न्याय दानाच्या प्रक्रियेतही ते सक्रिय होते.जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या कायदे क्षेत्रात भर टाकण्याचे काम दुसºया पिढीतील स्व. अॅड. अच्युतराव वामनराव अत्रे यांनी केले. १९६२ मध्ये त्यांनी आपल्या वकिलीस सुरूवात केली. या क्षेत्रात त्यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. केवळ कोर्ट आणि वकिली यावरच न थांबता विधी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तेथे ज्ञान दानाचे काम अॅड.अच्युतराव अत्रे यांनी केले.महाविद्यालयात शिकवत असताना घरी देखील अनेक विद्यार्थी मार्गदर्शनासाठी येत. भारतीय दंड विधानातील बारकावे या विद्यार्थ्यांना ते समजावून सांगत. या विद्यार्थ्यांना ते मोफत मार्गदर्शन करीत. एका पिढीस कायद्याचे बारकावे व्यवस्थित समजावे यासाठी त्यांची सतत धडपड असायची. न्यायालयातही त्यांचा मोठा दबदबा असायचा. जे काय मांडणार ते सत्य, स्पष्ट, पारदर्शी व परखड या लौकीकामुळे सर्वच त्यांना मान देत असत. यासह रामजन्मभूमी चळवळ, विश्व हिंदू परिषदेतही ते सक्रीय होते. शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेत ते अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते. तिसºया पिढीतील अॅड. सुशील अच्युतराव अत्रे यांनी १९८८ पासून वकीलीस प्रारंभ केला. संस्काराच्या पाऊल वाटेने जात असताना सुशील अत्रे यांनीही न्याय दानाच्या प्रक्रियेत आपली वेगळी ओळख निर्माण केली.अॅड. अच्युतराव अत्रे यांच्या निधनानंतर अॅड.सुशील यांनी शिक्षण क्षेत्रातील कार्याची ज्योत तेवत ठेवली. ते शि.प्र. मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांनी सुरू केली. गोरगरीबांच्या मुलांनाही इंग्रजीचे चांगले ज्ञान मिळावे म्हणून ही शाळा प्रयत्नशिल आहे. व. वा. जिल्हा वाचनालय, ब्राह्मण संघ या संस्थांमध्ये काम करत असताना आपल्या कामाची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण करून दिली. जणू अॅड. अच्युतराव अत्रे यांच्या कार्याच्या लौकीकात सुशील अत्रे यांनी भर टाकल्याचे लक्षात येते. यासह त्यांचे बंधू अॅड. पंकज अत्रे यांनी २००० मध्ये वकीलीस सुरूवात केली. बहिण अॅड. निलिमा अत्रे या विवाहानंतर औरंगाबाद येथे गेल्या. तेथे जिल्हा न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या खंडपीठात त्यांनी वकीली केली. त्यानंतर आता त्या जालना येथे ग्राहक मंचाच्या अध्यक्षा आहेत. तर आता चौथ्या पिढीतील अॅड. निशांत सुशील अत्रे यांनी २०१४ पासून आपल्या वकीली व्यवसायास प्रारंभ केला आहे. वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत विविध खटल्यांच्या कामकाजात ते सहभागी होत आहेत.
वकिली क्षेत्रात अत्रे यांची चौथी पिढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:37 PM