जळगाव : डोळ्यांचे आॅपरेशन झालेल्या नातेवाईकांना पाहण्यासाठी गेलेल्या गिरधारी शांताराम गरुड (३०) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील पाच हजार रुपये रोख व काही चिल्लर लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी खोटे नगरातील इंद्रनील सोसायटीत उघडकीस आली. दरम्यान, घरफोडी करताना चोरट्यांनी शेजारील घरांच्या दरवाजाच्या कड्या लावल्या होत्या.इंद्रनिल सोसायटी येथे गिरधारी शांताराम गरूड हे पत्नीसह भाड्याच्या घरात राहतात. ते खासगी नोकरी करुन उदरनिर्वाह भागवितात. भुसावळ येथे सासऱ्यांचे डोळ्यांचे आॅपरेशन झाल्याने त्यांना पाहण्यासाठीगरुड हे पत्नीसह रविवारी दुपारी ४ वाजता घराला कुलुप लावून भुसावळला गेले होते. दरम्यान, मध्यरात्री रात्री २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंडी कपाट तोडून ऐवज लांबविला.विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील विळ्याच्या मदतीने कपाट तोडले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून ५ हजार रुपये रोख व काही चिल्लर चोरून नेली. गिरधारी गरूड यांना मालक हिम्मत जाधव यांनी सोमवारी सकाळी चोरी झाल्याने कळविले. यानंतर गरुड यांनी जळगाव गाठले व घराची पाहणी केली. याप्रकरणी गिरधारी गरूड यांच्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विळ्याने कपाट तोडून खोटे नगरात ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 9:17 PM