चाळीसगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रज्वलीत झालेली स्वर्णिम विजय मशाल यात्रा गुरुवारी सायंकाळी शहरात आगमन होताच शहरवासीयांकडून यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागताने यात्रेसोबत आलेले सैन्य दलातील अधिकारी अक्षरशः भारावले. या यात्रेच्या निमित्ताने देशभक्तीचा जागर करण्यात आला. यावेळी येथील रहिवासी तथा भारत सरकारच्या महावीर चक्राने सन्मानीत स्वर्गीय मेजर जनरल अ. वि. नातू यांच्या शेतासह निवासस्थानातील माती कलशातून दिल्ली येथे साकारल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युद्ध स्मारकासाठी नेण्यात आली.औरंगाबाद येथून सकाळी सव्वादहाला कन्नड बायपास रस्त्यावर यात्रेचे आगमन झाले. त्या ठिकाणी वाहतूक शाखेचे सपोनि प्रकाश सदगीर, सहकारी, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी स्वागत करुन यात्रेला शहरात आणले. सिग्नल चौकात स्वर्णिम विजय मशाल यात्रा आल्यानंतर मिरवणुकीने य. ना. चव्हाण महाविद्यालयात स्वागताचा जाहीर कार्यक्रम झाला. मिरवणुकीच्या अग्रभावी एनसीसी, एनएसएस, स्काऊट- गाईडच्या विद्यार्थी सहभागी झाले होते. बॅन्डच्या तालावर देशभक्तीपर गीते वाजवण्यात आली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला खासदार उन्मेश पाटील अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव अरुण निकम, कृषी उपायुक्त अनिल भोकरे, लेफ्टनंट कमांडंट गुलबक्षी काळे, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, चित्रसेन पाटील, जळगाव माजी सैनिक कल्याणच्या प्रतिभा चव्हाण, उमंग महिला परिवाराच्या संस्थापिका संपदा पाटील, शिवनेरी फाऊंडेशनच्या प्रतिभा चव्हाण, किसनराव जोर्वेकर, डॉ. महेश पाटील, डॉ.सुनील राजपूत आदी उपस्थित होते.यात्रेसोबत आलेले कॅप्टन आकाश माने यांनी चाळीसगावकरांच्या स्वागताने आपण भारावलो असून आजपर्यंतचा सर्वाधिक भव्यदिव्य असा हा स्वागत सोहळा असल्याचे सांगितले. १६ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या यात्रेची सुरवात झाली असून १९७१ मध्ये परमवीर चक्राने ज्या वीरपुत्रांना सन्मानीत करण्यात करण्यात आले, त्यांचा राष्ट्रीय सन्मान करण्याचा मशाल यात्रेचा उद्देश आहे. ही यात्रा दक्षिण दिशेवरुन दिल्ली, आग्रा, भोपाळ, इटारसी, नागपूर, औरंगाबाद येथून चाळीसगावला आली. येथील स्वर्गीय मेजर जनरल अ. वि. नातू यांच्या घराची व शेतातील माती कलशात घेऊन ही यात्रा आपला पुढील प्रवास हैदराबाद, कोची, अंदमान-निकोबारकडे कूच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी साक्षी ठोंबरे हिने देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. प्रशांत पोतदार यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. संगीता देव यांनी सूत्रसंचालन तर ब्रिगेडीयर विजय नातू यांनी आभार मानले.
राजधानी दिल्लीत दरवळणार चाळीसगावातील मातीचा सुगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 3:03 PM
राजधानी दिल्लीत चाळीसगावातील मातीचा सुगंध दरवळणार आहे.
ठळक मुद्देस्व. मेजर जनरल अ. वि. नातूंचा सन्मानमेजर जनरल अ. वि. नातू यांच्या घराची व शेतातील माती कलशात घेऊन ही यात्रा पुढील प्रवास करणार