मनपापाठोपाठ वैद्यकीय महाविद्यालयाकडूनही ठेकेदाराला नोटीस : मनपाकडे सादर केला खुलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील जैविक कचरा संकलनाचा ठेका असलेल्या मन्साई बायोमेडिकल वेस्ट कंपनीने महापालिकेसोबतच आता वैद्यकीय महाविद्यालयाचीही फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने मन्साई बायोमेडिकल वेस्ट कंपनीला आठ दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच याबाबत प्रशासनाने चौकशी समितीही नेमण्याच्या सूचना आता दिल्या आहेत. दरम्यान, ठेकेदाराने महापालिका प्रशासनाकडे नुकताच खुलासा सादर केला असून, मनपा प्रशासन विधितज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
काही दिवसांपूर्वी संबंधित कंपनीने मनपा प्रशासनाकडे दिलेल्या जिल्ह्यातील रुग्णालयांच्या यादीमध्ये काही रुग्णालयांचा समावेश न करता, महापालिकेकडून आवश्यक माहिती लपवली होती. याबाबत दिनेश भोळे यांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार सादर केल्यानंतर मनपा प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच आरोग्य विभागाला याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेशदेखील मनपा प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने महापालिका प्रशासनाकडे खुलासा सादर करण्यास टाळाटाळ केली होती. अखेर मंगळवारी मन्साई बायोमेडिकल वेस्ट कंपनीकडून मनपाला खुलासा सादर करण्यात आला आहे. याबाबत मनपा प्रशासनाने विधितज्ज्ञांकडून सल्ला मागवला असून, याप्रकरणी प्राथमिक चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांनी दिली आहे.
करारनाम्यातील कराराची मुदत वाढवली ?
वैद्यकीय महाविद्यालयकडे प्राप्त झालेल्या तक्रारीत संबंधित कंपनीने जिल्हा रुग्णालयाकडे जैविक कचरा संकलनासाठी केलेल्या अर्जात मनपासोबत वीस वर्षांचा करार असतानादेखील, वैद्यकीय महाविद्यालयाला सादर केलेल्या कागदपत्रात हा करार २५ वर्षे असल्याचे दाखवण्यात आल्याची तक्रार दिनेश भोळे यांनी केली आहे. तसेच संबंधित तक्रारदाराने वैद्यकीय महाविद्यालयाकडे काही पुरावेदेखील सादर केले आहेत. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने बुधवारी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून, याबाबतचा खुलासा सात दिवसात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. यामुळे संबंधित कंपनीच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
कोट..
मनपाने बजावलेल्या नोटीसीला संबंधित ठेकेदाराने उत्तर दिले असून, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल.
- पवन पाटील, सहाय्यक आयुक्त मनपा