लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : बँकेतून बोलत असल्याचे सांगून सायबर ठगाने एका महिलेची साडेसात लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री सायबर पोलिसात सायबर ठगाविरूध्द गुन्ह्याची नोंद झाली आहे.
४८ वर्षीय महिला ही ढाके कॉलनीमध्ये वास्तव्यास आहे. सोमवारी दुपारी ३.३८ वाजेच्या सुमारास त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपण बंधन बँकेतून बोलत असून आमच्या बँकेतील तुमची एफडी अपडेट करायची आहे, त्यामुळे तुम्हाला आलेला एक मेसेज मला पाठवा, असे त्या व्यक्तीने सांगितले. महिलेला समोरील व्यक्तीवर विश्वास झाल्यानंतर तिने आलेला मेसेज त्या व्यक्तीला पाठविला. काही मिनिटात त्यांना त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढण्यात आल्याचा मेसेज प्राप्त झाला. त्यामुळे त्यांना लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे.
दरम्यान, सायबर भामट्याने महिलेची ७ लाख ७५ हजार रूपयांची एफडी तोडून ती परस्पर वळून घेतल्याचे काही वेळानंतर समोर आले. महिलेने लागलीच सायंकाळी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सायबर ठगाविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.