जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या पोलिस मुख्यालयातील नंदा कालू पानपाटील (५३ रा. नवीन पोलीस वसाहत) यांचे एटीएम कार्ड अदलाबदली करून चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून परस्पर १५ हजार रूपये काढल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी रविवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिस मुख्यालयात नोकरीला असलेल्या नंदा पानपाटील शुक्रवार, दि. ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलसमोरील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. एटीएममधून पैसे निघाले नाही म्हणून त्यांनी मागे उभा असलेला अनोळखी व्यक्तीला त्यांना मदत करण्यास सांगितले. त्या व्यक्तीने त्यांना एटीएममधून ९ हजार ५०० रूपये काढून देत तेथून निघून गेला.
पुन्हा पैसे काढायचे असल्याने त्यांनी पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, पैसे निघाले नाही. नंतर दुसरा अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येवून मी तुम्हाला मदत करतो असे सांगून बोलण्यात गुंतविले. नंतर एटीएमची अबदलाबदल केली. शेवटी एटीएममधील काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचे पैसे निघत नाही असे सांगून तो व्यक्ती तेथून निघून केला.
काही मिनिटांनी पानपाटील यांना एटीएम कार्ड अदलाबदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच बँकेमॅनेजर यांची भेट घेवून एटीएम ब्लॉक करण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत चोरट्याने गणेश कॉलनीतील एका बँकेच्या एटीएममधून १५ हजार रूपये काढल्याचे लक्षात आले. रविवारी महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.