जळगाव : फ्रिडम ग्लोबल रिसर्च, कन्सल्टन्सी या फर्मच्या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक करणाऱ्या संदीप विवेककुमार भारद्वाज (वय ३२,रा.इंदूर, मध्य प्रदेश) याला एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
अयोध्या नगरातील रहिवासी श्याम आत्माराम पाटील (वय ४०) या तरुणास संदीप भारद्वाज, दिलीप मिश्रा व मल्होत्रा या तिघांनी फ्रिडम ग्लोबल रिसर्च, कन्सल्टन्सी या फर्मच्या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून २ लाख ३५ हजार ५७७ रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी २ मे २०२० रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. श्याम यांनी १४ डिसेंबर २०१९ ते १४ मे २०२० या कालावधीत वेळावेळी ऑनलाइन पैसे भरले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अंमलदार गफूर तडवी व शांताराम पाटील यांनी इंदूर येथे जाऊन संशयितास ताब्यात घेतले. रविवारी त्याला तपासाधिकारी अमोल मोरे व रतिलाल पवार यांनी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अटकेनंतर संशयिताकडून फसवणुकीची पूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.