जळगाव: सैन्य दलातील जवानांची वैद्यकीय तपासणी करायचे असल्याचे सांगत फोन पेची संपूर्ण माहिती घेऊन डॉ. सुजाता प्रमोद महाजन (६२, रा. गांधीनगर, जिल्हापेठ) या महिला डॉक्टरची एक लाख २४ हजार ९९२ रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना २१ मे रोजी घडली. याप्रकरणी सोमवार, १० जून रोजी अज्ञातांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधीनगरात डॉ. सुजाता महाजन यांचे हॉस्पिटल असून २० मे रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. समसोरील व्यक्तीने त्यांना सैन्य दलातील अधिकारी बोलत असून तुमच्याकडे जवानांची तपासणी करायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने व्हिजिटिंग कार्ड मागविले. त्यानुसार डॉक्टरांच्या चालकाने त्याच्या मोबाईलवरुन कार्ड पाठवले.
दुसऱ्या दिवशी महिला डॉक्टरच्या पतीशी समोरील व्यक्ती बोलला व त्याने ४० ते ५० जवानांची तपासणी करायचे असल्याचे सांगितले. डॉ. प्रमोद महाजन यांनी पत्नी डॉ. सुजाता महाजन यांचा फोन पे क्रमांक दिला. त्या वेळी ठगाने डॉ. सुजाता महाजन यांच्यासोबत संपर्क साधून त्यांच्याकडून फोन पेची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर बोलणे सुरू असतानाच डॉ. महाजन यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होवू लागले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून एक लाख २४ हजान ९९२ रुपये ट्रान्सफर झाले. या प्रकरणी त्यांनी १० जून रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.