जळगाव : बँकेत नोकरीसाठी पाच जणांकडून २९ लाख ८० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या अंकित गोवर्धन भालेराव (वय २८, रा.मुक्ताईनगर) (वैभव राणे डमी नाव) याने आपली कार चोरल्याचा बनाव करून रामानंदनगर पोलिसांकडे तक्रार दिली अन् तेथेच जाळ्यात अडकला. इतकेच काय, त्याच्या या कारनाम्यात सहभागी असलेली बहीण व आई हेही आयतेच पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या अमोल प्रदीप चौधरी (रा.वसई) या तरुणाची जानेवारी, २०२० मध्ये वैभव राणे (अंकित) नामक नावाच्या व्यक्तीशी नाशिक येथे भेट झाली. एका सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. डिस्ट्रिक्ट ऑडिटर म्हणून पुण्यात काम करीत असल्याचे राणे याने सांगितले, त्याशिवाय लेवा पाटील समाजाचेही कार्य करीत असल्याचे सांगितले, तसेच राणे याने स्टेट बँकेत शाखा व्यवस्थापक या पदावर तुझे काम करून देतो, असे आमिष अमोलला दाखविले. लॉकडाऊनमुळे हातचे काम गेल्याने अमोल यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ५ जून, २०२० ते २३ जानेवारी, २०२१ या कालावधीत नोकरीची प्रोसेस करण्याच्या नावाखाली त्याने अमोल यांच्याकडून ४ लाख ६८ हजार रुपये घेतले. कोरोनामुळे सहा महिने काम लांबणीवर पडल्याचे सांगून काही दिवस लांबविले. त्यानंतर, ९ ते १६ जुलै, २०२१ या कालावधीत पुन्हा २१ हजार रुपये ऑनलाइन घेतले.
आई, मुलगा व बहीण तिघे कोठडीत
अंकित उर्फ राणे याने अमोल चौधरीसह हेमंत सुभाष भंगाळे (वय ३३,रा.नेहरूनगर) या तरुणाला ४ लाख, पूर्वा ललित पोतदार (वय ३२, रा.पुणे) यांना ७ लाख ३० हजार, देवेंद्र सुरेश भारंबे (वय ३६, रा.भुसावळ) यांना २ लाख ४० हजार तर बांधकाम व्यावसायिक नितीन प्रभाकर सपके (वय ४५, रा.आनंदनगर, जळगाव) यांना १२ लाख ६० हजार रुपयात फसविल्याचेही निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांनी आई, मुलगा व मुलगी अशा तिघांना अटक करून, सोमवारी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.