किरकोळ कारणावरून विसरवाडीत तणाव
By admin | Published: September 11, 2015 9:32 PM
प्लॅस्टिकची कॅरीबॅग हॉटेलमधून देण्याच्या वादातून विसरवाडीत दुपारी तणाव निर्माण झाला होता.
विसरवाडी : प्लॅस्टिकची कॅरीबॅग हॉटेलमधून देण्याच्या वादातून विसरवाडीत दुपारी तणाव निर्माण झाला होता. हजारोंचा जमाव हॉटेलवर चाल करून आला, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत विसरवाडी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विसरवाडी येथे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी आहे. असे असतांना एका हॉटेलमध्ये त्याचा वापर केला जात होता. ही बाब विसरवाडी येथील एका युवकाने हॉटेलमालकाला लक्षात आणून दिली. त्याचा राग येवून हॉटेल मालकाने त्या युवकाला व त्याच्यासोबत असलेल्या आणखी एकाला जबर मारहाण केली. ही बाबत गावात तसेच परिसरातील खेडय़ांमध्ये पसरल्यावर हजारो युवकांचा जमाव विसरवाडी दाखल झाला. जमाव हॉटेलवर चाल करून जाणार तोच विसरवाडी पोलीस ठाण्याचे निरिक्षक जितेंद्र सपकाळे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद टाळला. तरीही संबधित हॉटेलमालकावर कारवाई करावी या मागणीवर जमाव ठाम होता. अखेर हॉटेलमालकासह आणखी एकाविरुद्ध विसरवाडी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेशन पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. (वार्ताहर)