लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : स्वातंत्र्यसेनानी आणि ‘लोकमत’ चे संस्थापक संपादक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ११ जून रविवार रोजी साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या वतीने मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) बसविण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे
सरदार वल्लभाई पटेल लेवा भवन, बीएसएनएल कार्यालयामागे जळगाव येथे सकाळी ९ ते २ या वेळेत हे शिबिर होईल. वेगवेगळ्या कारणांनी हात किंवा पाय गमावलेल्यांना कृत्रिम अवयवांचे बळ मिळून आयुष्यात नवी उमेद जागविण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे. शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक कृत्रिम अवयवांचे माप घेतले जाईल. त्यानंतर काही दिवसांनंतर कृत्रिम अवयवांचे वितरण केले जाईल. लोकमत समूहातर्फे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात पोलिओग्रस्त रूग्णांना कृत्रिम अवयव मिळणार नाहीत.
मधुमेह रक्तवाहिन्यांचे आजार, गँगरीन, अपघात आणि इतर कारणांमुळे हात-पाय गमविण्याची वेळ काहींवर येते. अशा व्यक्तींना दैनंदिन जीवन जगताना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र कृत्रिम हात-पाय बसवल्याने संबंधित व्यक्ती व्यवस्थित कामे करू शकते. हे कृत्रिम अवयव वापरण्यास अत्यंत सोपे असतात. या कृत्रिम अवयवांमुळे अगदी पूर्वीप्रमाणे व्यक्ती चालू शकतो, सर्व कामे करू शकतो. या अवयवांच्या मदतीने अगदी सायकल, रिक्षा चालविण्यासह ॲथलेटिक्स, खेळ आणि नृत्यातही सहभागी होता येते.
नोंदणी करण्यासाठी संपर्क
- कृत्रिम अवयव घेणे आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना शक्य होत नाही. मात्र या शिबिराच्या माध्यमातून हे कृत्रिम अवयव मिळणे शक्य होणार आहे.
- शिबिरात सहभागी होण्यासाठी ९४०३५१५६४८ या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.