लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : येथे व परिसरात वन्यजीव प्राण्यांचा मुक्त संचार वाढल्यामुळे शेतात उभी असलेली पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग बेजार झाला असून नीलगाय (लोधडे)यासह वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त व्हावा व उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.
नशिराबाद शिवार परिसरात सुनसगाव रोडलगत बेळी रोड शेत परिसरामध्ये नीलगाय यांचा मुक्त संचार दिवसेंदिवस वाढत आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांमध्ये वन्यप्राण्यांचा मुक्त संचार व नासधूस मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे शेतातील हरभरा दादर परिसरात असलेली केळी आदींचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही ठिकाणी तर उभे पीकच उद्ध्वस्त केले असल्याची माहिती शेतकरी देत आहे. अनेकदा ओरड करूनही त्याकडे दुर्लक्ष पदरी पडल्याचे शेतकरीवर्ग सांगत आहे. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहेत. त्यासोबत वन्यप्राण्यांचा बंदोबस्त व उपाययोजना तात्काळ व्हावी अशी मागणी होत आहे.