लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : म्यूकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये अगदी झपाट्याने वाढ हाेत असल्याने गरीब, गरजू अशा रुग्णांची म्यूकरमायकोसिसची संबधित तज्ञांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे. यात बाधित आढळून येणाऱ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जाणार आहे. सेवारथ परिवार व लेवा पाटीदार स्पोर्टस फाऊंडेशेनकडून शुक्रवारपासून हा उपक्रम राबविला जात आहे.
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील डॉ.रितेश पाटील यांच्या रामनंदा या रुग्णालयात रुग्णांनी सकाळी १० ते २ यावेळस यावे, याठिकाणाहून त्यांना कान, नाक, घसा तज्ञ किंवा नेत्रतज्ञ यांच्याकडे पाठवून त्यांची दुर्बीणीद्वारे एन्डोस्कोपीक तपासणी विनामुल्य केली जाणार आहे. तज्ञांचा सल्लाही या ठिकाणी या गरजू रुग्णांना मिळणार आहे. म्यूकरमायकोसिस या आजाराचे उपचार महागडे असून ग्रामीण भागातील, किंवा गरीब रुगण या आजाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने तो जीवावर बेतत असल्याचे गंभीर चित्र आहे.
हे आहेत निकष
कोविडमधून नुकतेच बरे झालेले, मधुमेह असलेले, शिवाय ऑक्सिजन लावावे लागणारे तसेच स्टेरॉईड दिले गेलेल्या रुग्णांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यांनतर तातडीने ही तपाणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. रितेश पाटील, डॉ. निलिमा सेठीया, दिलीप गांधी, चंदन कोल्हे, मनिष चौधरी यांनी केले आहे.
म्यूकरमायकोसिस या आजाराची पहिल्या दहा दिवसात लक्षणे जाणवायला लागतात, मात्र, दिवसेंदिवस हा आजार झपाट्याने वाढत जातो, यासाठी एक एक दिवस महत्त्वाचा असतो याचे लवकर, अगदी तातडीने निदान झाल्यास रुग्ण बरा होतो. अन्यथा शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे रुग्णांनी रुग्णालयातून सुटी झाल्या झाल्या तातडीने याचे निदान करून घ्यावे, असे डॉ. रितेश पाटील यांनी म्हटले आहे.