जळगाव : गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये दर महिन्याला पेट्रोलसह डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे, डिझेल ८० रुपये लिटरच्या घरात पोहोचले आहे. यामुळे मालवाहतूक ट्रक मालकांना व्यवसाय करणे अवघड झाले असून, भाडेवाढ करायची म्हटल्यावर व्यापारी व उद्योजकांकडून कोरोनामुळे व्यवसाय मंदावल्याचे सांगत भाडेवाढ मिळत नसल्याचा सूर ट्रकचालकांमधून उपस्थित होत आहे.
जळगाव व तालुक्यातून विविध व्यापारी व लहान मोठ्या-उद्योजकांचा माल मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांमध्ये जात असतो. शहरातील जवळपास दीडशे ते दोनशे ट्रक नेहमी उद्योजकांच्या मालाची वाहतूक करीत असतात. मालवाहतूक करण्यासाठी संबंधित ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडे चालक, क्लनर व हमाल बांधव काम करीत असून, या माल वाहतुकीमध्ये जवळपासहून ५०० हून अधिक मजुरांचे हात राबत आहेत.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रकमालकांना मालवाहतुकीचा व्यवसाय करणे अडचणीचे ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रकवरील कर्मचाऱ्यांचे पगार, ट्रकचे मेंटेनन्स व कर्जाचे हप्ते भरण्यासाठी ट्रकमालकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, असे असताना उद्योजकांकडून मालवाहतुकीचे दर वाढविण्यास भाववाढ मिळत नसल्यामुळे हा व्यवसाय करणे अवघड जात असल्याचे ट्रकमालकांनी सांगितले.
इन्फो :
कोरोना काळात गेल्या सात ते आठ महिन्यात डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे, ट्रक मालकांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे. एकीकडे डिझेलचे दर वाढले असताना, मालवाहतुकीच्या दरात वाढ न झाल्यामुळे, व्यवसाय अडचणीत आला आहे. उद्योजक-व्यापारी कोरोनामुळे व्यवसाय मंदावल्याचे सांगत, भाववाढ देत नसल्यामुळे आहे त्या परिस्थितीत व्यवसाय करावा लागत आहे.
जसपालसिंग बग्गा, अध्यक्ष : जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन.
इन्फो :
डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रान्सपोर्ट करणाऱ्या ट्रक मालकांनीही मालवाहतुकीचे दर वाढविले आहेत. त्यांनी लावलेल्या दरानुसारच उद्योजकांकडून ट्रक मालकांना भाडे देण्यात येत आहे. मात्र, या सर्व प्रकारच्या दरवाढीचा फटका शेवटी ग्राहकांना बसत असून, सरकारने डिझेलचे दर आटोक्यात आणणे गरजेचे आहे.
प्रेम कोगटा, अध्यक्ष, जिल्हा दालमिल असोसिएशन.