लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा कहर सुरू असून, गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल असून, या रुग्णांचे नातेवाईक अगदी हतबल व भीतीदायक चेहऱ्याने बाहेर आपला रुग्ण बरे होण्याची वाट बघत असल्याचे अत्यंत संवेदनशील चित्र कायम नजरेस पडत आहे. यात अनेक जण तर साईबाबा मंदिरातच आसरा घेत आहेत.
रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सेवालयाच्या बाजूला बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नातेवाईक मिळेल त्या ठिकाणी झाडाच्या सावलीत किंवा भिंतीच्या सावलीत आसरा घेत आपल्या नातेवाइकाच्या उपचारांबाबतच चर्चा करताना दिसतात. रुग्ण दाखल करण्यापासून सुरू झालेली ही नातेवाइकांची धावपळ अगदी नातेवाइकाचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीपर्यंतही थांबत नसल्याचे अत्यंत गंभीर चित्र अनेक दिवसांपासून कायम आहे. अनेक रुग्ण बरे होऊन घरीही जातात, त्याचा तेवढा आनंदही नातेवाईक व्यक्त करीत असतात, एका तरुणाने आपली ५५ वर्षीय आई कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयाला काहीतरी दान देण्याचा मानस थेट अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे व्यक्त केला होता.
रुग्णवाहिकेचा आवाज अन् भीती
या रुग्णालयात अगदी क्षणाक्षणाला रुग्णवाहिकेचा आवाज कानावर पडत असतो, अशा वेळी या नातेवाइकांमध्ये हा आवाज ऐकल्यानंतर भीतीची भावनाच त्यांच्या चेहऱ्यावर येत असते. या ठिकाणी केवळ गंभीर रुग्ण दाखल केले जातात. त्यामुळे हे भीतीचे वातावरण कायम असते. मिळेल त्या ठिकाणी आसरा आणि वेळ मिळाल्यास जेवण असा दिनक्रम या नातेवाइकांचा सध्या सुरू आहे. आपली जवळची व्यक्ती बरी होऊन कधी बाहेर येईल, याची हे चेहरे आतुरतेने वाट पाहत असतात.
...अन् येथेच कोसळतात नातेवाईक
अनेकांचा तरुण मुलगा, मुलगी, अनेकांचे आई-वडील जवळचे नातेवाईक यांच्या मृत्यूची वार्ता येताच या रुग्णालय परिसरातच नातेवाईक कोसळतात, रडतात, दु:ख व्यक्त करतात. ही स्थिती दिवसातून अनेक वेळा या ठिकाणी निदर्शनास येते.
कोविड रुग्णालय एकूण बेड : ३६८ ऑक्सिजन बेड : ३१४
अतिदक्षता विभाग बेड ५६
आपात्कालीन विभागात सुरुवातीला रुग्णाला दाखल करून नंतर ज्या कक्षात जागा खाली असेल त्या कक्षात दाखल केले जाते.