जळगाव : शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. देशपातळीवर नामांकित एजन्सीला हे काम दिले जाणार असून त्यासाठी एकच निविदा काढली जाईल. संपूर्ण रस्ते कॉक्रीटीकरणात होतील. चार महिन्यात ते पूर्ण केले जाणार असल्याची माहिती वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ ला दिली. शहरातील विकासाचा अनुशेष सहा महिन्यात भरुन काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाकडून जळगाव शहरातील ४२ रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी बुधवारी मंजूर झाला. जिल्ह्यात जुलैमध्येच पावसाळा सुरु होतो. त्यामुळे जुलै किंवा जास्तीत जास्त ऑगस्ट महिन्यात पावसाळ्याआधी शहरातील रस्ते पूर्ण केले जातील. रस्त्यांच्या कामात होणारा हस्तक्षेप व दर्जा पाहता हे काम कोणत्याच स्थानिक कंत्राटदाराला दिले जाणार नाही. एकेकावेळी हजारो कोटी रुपयांचे दर्जेदार काम करणाऱ्या नामांकित एजन्सीलाच हे काम दिले जाणार आहे.
संपूर्ण रस्त्यांच्या वेगवेगळ्या निविदा न राबविता एकच निविदा काढली जाईल. डांबरीकरण रस्त्यांचे आयुष्य व दर्जा पाहता ४० वर्ष टिकतील असे कॉक्रीटीकरणाचे रस्ते तयार केले जातील. गेली अडीच वर्ष सत्ता नसल्याने शहरात विकास कामांना ब्रेक लागला होता. घोषणा करुनही कामे होत नव्हती. जळगावकरांना रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागला, त्याचे वाईट वाटते, मात्र आता सहा महिन्यात पूर्ण अनुशेष भरुन काढला जाणार आहे. ज्या भागातील रस्ते राहतील, त्यासाठी आणखी ५० कोटी रुपये देण्याची तयारी सरकारची आहे.