पहूर, ता.जामनेर : पिंपळगाव कमानी तांडा परिसरात सुरु असलेल्या गावठी दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही दिवसापूर्वी एका युवकाने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. दारूबंदी करावी या मागणीसाठी कमानी तांडा भागातील महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत सरपंचांना घेराव घातला. समस्येचे निवारण न झाल्यास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घालण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला.
माजी सरपंच सावजी राठोड यांच्या साठ वर्षांच्या कार्यकाळापासून तांड्यात गावठी दारूला बंदी होती. काही दिवसांपासून तांडा परिसरात गावठी दारूची खुलेआम विक्री सुरु झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पांडूरंग धनसिंग चव्हाण या युवकाने दारूच्या नशेत विषारी द्रव्य सेवन करून जिवन यात्रा संपविली आहे. काही अल्पवयीन युवक व्यसनाधीन झाले आहेत. याबाबत अनेकवेळा पोलीस पाटील इंदलचंद चव्हाण, महिला सरंपच भागाबाई कपूरचंद चव्हाण यांनी पहूर पोलिस स्टेशनला निवेदन देऊन दारूबंदीची मागणी केली आहे.पोलीस तात्पुरती कारवाई करीत असल्याने समस्या कायम आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी रविवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. संतप्त महिलांनी सरपंच भागाबाई चव्हाण यांना घेराव घातला. यावेळी माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, रोजगार हमी योजनेचे तालुका अध्यक्ष समाधान पाटील यांनीसंतप्त महिलांची समजूत काढली. सरपंच भागाबाई चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच कल्पना चव्हाण, पोलीस पाटील इंदलचंद चव्हाण, माजी सरपंच प्रेमराज चव्हाण, अर्जुन राठोड, दुर्गार्बाई प्रधान,कौशीबाई चव्हाण यांच्यासह महिला उपस्थित होत्या.