ऑनलाइन लोकमतअडावद, जि. जळगाव, दि. 15 - नळांना पाणी येत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी चोपडा तालुक्यातील अडावद येथे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. यावेळी सरपंचपतींना घेराव घालून ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठय़ाचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 4 मधील नेहरु चौक, पाटील वाडा, शिंपी गल्ली व मोमिन मोहल्यात गेल्या महिनाभरापासून चार ते पाच दिवसांनी अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीला कळवूनदेखील कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आज महिलांसह नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला.पाणी प्रश्नासाठी महिलांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला मात्र सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य कुणीही उपस्थित नव्हते. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सरपंचांचे पती सचिन महाजन यांना घेराव घालत आपल्या समस्या मांडत संताप व्यक्त केला. मोर्चा ग्रामपंचायतीवर जात असल्याचे माहित पडताच काही ग्रा.पं. सदस्य ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नाही. तब्बल तासभर ग्रामपंचायत कार्यालयात गोधळ सुरू होता. ऐनवेळी माजी पंचायत समिती सभापती शेख ताहेर मन्यार, पंचायत समिती सदस्या अमिनाबी तडवी, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत महाजन, शकिल्लोदीन शेख, चंद्रकांत पाटील हे उपस्थित झाले व सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या.2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करणारप्रभाग क्रमांक 4 मधील नेहरु चौक, मोमीन मोहल्ला, शिंपी गल्ली व पाटील वाडय़ात दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. यासाठी तातडीची बैठक घेणार असल्याचे आश्वासन सरपंचपती सचिन महाजन यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ व महिला माघारी परतल्या.
पाण्यासाठी अडावद येथे ग्रामपंचायतवर मोर्चा
By admin | Published: May 15, 2017 5:59 PM