फुलारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:31 PM
पाठमोरी आहे तरी हे नक्की की, तिचा चेहरा निश्चितच तृप्त, आनंदी आणि प्रसन्न असणार आहे.
ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 23 - हे अद्याप सिद्ध झाले की नाही; माहिती नाही. पण फुलांचे ताटवे, त्यांचे रंग व सुवास चित्त स्थिर करण्यास आणि विचारी करण्यास मदत करतात की कसे? आपण जे सोबतचे हातात फुलांचा गजरा असलेल्या एका वयोवृद्ध महिलेचे जे चित्र बघत आहात, त्याने मात्र मला हा एक लेख एकटाकी लिहिण्यास निश्चित मदत केली. मला त्या आजीचे आभार मानावयास पाहिजेत, मला ती फुलांकडे घेऊन गेली. बघा कशी उभी आहे! काही न बोलताही त्यांची सारी फुलं विकली जाणार आहेत. त्यांनी फार मन लावून हार केले आहेत, गजरे केले आहेत आणि त्या तुम्हाला सुटी फुलंही देणारच आहेत! सतत कार्यमग्न असणारी ही वृद्धा फार लोभी नाहीये, काटक आहे. ताठ उभी आहे, स्वाभिमानी आहे, तिची कुटुंबाला आपल्या परीने मदत करण्याची इच्छा पुष्कळ काही शिकवणारी आहे. तिचे मेहनतीचे पैसे आहेत. पाठमोरी आहे तरी हे नक्की की, तिचा चेहरा निश्चितच तृप्त, आनंदी आणि प्रसन्न असणार आहे.कोठेही दुस:या गावी जर मी गेलो, तर तिथला फुलबाजार पाहण्याकडे माझा ओढा असतो. हाराने लावलेली फुलं मन प्रसन्न करतात. बाग फुलवतात मनातल्या मनात. आज फुलांची बात करतोय. ही अनेक ठिकाणी देता येतात. दिल देणे-घेणे, इस्पितळातील एखादा रुग्ण, अभिनंदन करावे असा काही प्रसंग किंवा व्यक्ती, देवालय, बायकोला गजरा, नुसताच तो फ्लॉवर पॉट सजवणे यासाठी फुले फार कामाची असतात. त्यात त्यांचे ते विविध प्रकार, मी नावे नाही सांगत.. रंग वेगळा, आकार वेगळा आणि सुवास तोही. आता मला धुळ्याचा आणि चिंचवडय़ा फुलबाजार आठवत आहे. मी तेथे थांबलो, थबकलो आणि फुले घेतलीच नाहीत, असे कधीच झाले नाही. आपल्याकडेही आधी गोलाणीत खूप जण असत. नंतर ते वेगवेगळय़ा ठिकाणी गेलेत. मी शेगावला जातो, त्याचे खरे कारण म्हणजे महाराजांनी माङयावर कृपा करावी, हे नसतेच. महाराजांच्या गळ्यातील हार हे खरे आकर्षण असते! फार कलाकुसर केलेली असते; जी मी डोळे भरून पहातो आणि काही मागायचे विसरूनच जातो! माङो स्पष्ट असे म्हणणे आहे की, तो हार अंघोळ घातल्यावर गजानन महाराज जिवंत होत भक्तांना पावतात.देवघरासाठी बागेतून फुले आणताना फार काळजी घ्यावी लागते. दोन कळ्यांमध्ये एक फुल फुललेले असते. ते कळ्यांना अजिबात इजा न होता खुडावे लागते, नाहीतर त्या गेल्याच वाया! देवांसाठी फुले की, फुलांसाठी देव? हा प्रश्न मला नेहमी पडतो. याशिवाय फुले झाडांवरच का नाही ठेवायची, असाही संभ्रम असतो. पण देवघरसुद्धा सुवासिक होणे आणि देवांना प्रसन्न वाटणे ही गृहलक्ष्मीची आवड असते. मग मधला मार्ग! थोडी फुले झाडावरच ठेवणे! ती त्या निसर्ग देवाची! अगदी सगळी वेचून, खुडून आणली क्वचित, तरी हिला जर वेळ असेल तर ती बागेतून ओंजळभर फुले आणतेच आणि मग तिचा तो कटाक्ष मला स्पष्टपणे सांगतो- ‘बघा हा पुरावा- तुमचे कोणत्याच कामात लक्ष नव्हते!’ मला एकदा जे सांगायचेच आहे ते येथे लिहितो- ‘बाई, मी गेल्यावर लगेचच काही फुलं तुङयासाठी उमलतात त्याला मी काय करू?’पाने-फुले कवितेकडे, रेषेकडे, जुन्या आठवणीकडे, एखाद्या गाण्याकडे हमखास नेतात. फुले देणा:याचा आणि घेणा:याचा एकाचवेळेस सन्मान करतात. दरम्यान, त्या गुलदस्त्यातील आकर्षक फुलांचाही आपोआपच सन्मान होत असतो. त्या निसर्गाचा सन्मान होतो. सुवास पोहोचवणा:या त्या लहरींचा सन्मान होतो. फुले अगदी कोठेही उमलतात. रानात-वनात-बागेत-घरात-परसदारी- अगदी पाण्यातही! फुलांशिवायच्या जगाची कल्पनाच करवत नाही. ती देवाने आणि निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात आनंददायी आणि उत्साहदायी अशीच भेट आहे. त्या फुलांच्या गंधकोषी तो आत्मा टाकायचा विसरला असला, तरी फुलं आपल्याशी बोलतातच! पृथ्वी जर गाणे म्हणत असेल तर ते फक्त फुल फुलण्यासाठीच.. ऋतू बदलत असतील, तर तेही फुलांसाठीच आणि सूर्यदेवही त्यासाठीच दररोज उगवत असावा.फ्रिदा काहलो नावाची एक मोठी चित्रकार होऊन गेली. तिने एके ठिकाणी म्हटले आहे- ‘आय पेंट फ्लॉवर्स सो दे विल नॉट डाय..’ आपल्या बा.भ.बोरकर या कवीश्रेष्ठांची एका कवितेतील ओळ आहे- ‘पुजेतल्या पाना-फुला, मृत्यू सर्वाग सोहळा-धन्य निर्माल्याची कळा- धन्य निर्माल्याची कळा.’ ...आता यापुढे मला काही लिहिणे शक्यच नाहीये.- प्रदीप रस्से