भुसावळ/वरणगाव : फुलगाव (ता. भुसावळ) येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र चौधरी यांच्या केळीच्या शेतातील पहिली गाडी इराणला निर्यात झाली आहे. हा माल कोल्हापूर येथील व्यापारी यांच्यामार्फत मुंबईतील बंदरावरून जहाजाद्वारे पाठविण्यात येणार आहे.
भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी हे रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीवर भर देतात. त्यामुळे त्यांच्याकडील शेतमालाला परिसरातसुद्धा मागणी असते. अशाच प्रकारे त्यांच्या शेतातील केळी पोलन ऍग्रो मिनरलमार्फत इराणला पाठविण्यात आली. त्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी प्रयत्न केले
जळगाव जिल्ह्यात केळीला नऊशे ते एक हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला असता; परंतु इराणला याच केळीला एक हजार चारशे रुपयांपर्यंत भाव मिळाल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळून चांगल्या दर्जाची केळी पिकवून उत्पादन वाढविले पाहिजे, अशी भावना आमदार सावकारे यांनी यावेळी व्यक्त केली.
केळी कापणीप्रसंगी फुलगावचे उपसरपंच राजकुमार चौधरी, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, अतुल झांबरे, संजय चौधरी, संग्राम कुरणे, बाळू सहाने, प्रथमेश चौधरी आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
आठ हजार खोडं केळीची लागवड
राजेंद्र चौधरी यांची एकूण २० एकर शेती आहे. यात त्यांनी आठ हजार खोडं केळीची लागवड केली आहे. ते गेल्या १५ वर्षांपासून केळीची लागवड करतात. सध्या चार एकरातील केळी काढणीयोग्य झाली असून, ती कोल्हापुरातील धरती ॲग्रो एक्स्पोर्ट कंपनीने उचल केली असून, एक्स्पोर्ट होत आहे. आतापर्यंत ४०० क्विंटल माल काढला गेला असून, अजून ४०० क्विंटल माल येत्या चार दिवसांत काढला जाणार आहे. पूर्ण हंगामात दोन हजार क्विंटल माल काढला जाणार असल्याची माहिती शेतकरी राजेंद्र चौधरी यांनी दिली. यासाठी त्यांना प्रतिखोड ४०- ५० रुपये खर्च आला आहे.