चोपडा : जळगाव येथील महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी चोपडा शहरात मोटारसायकलवर येऊन तोंडाला स्कार्फ बांधून सराईत गुन्हेगारी करून लुटीचा प्रयत्न करतात. यामागील कारणांचा शोध घेतला असता केवळ भरपूर पैसा लागतो या कारणानेच हे दोघे भरपूर पैसा कमवायचा या उद्देशाने भरकटले असल्याचे लक्षात आले आहे. विशेष म्हणजे पालकांचीही या ‘बंटी-बबली’ने दिशाभूल केली आहे.जळगाव येथे राहणारा गिरीश सपकाळे व तेथीलच डिंपल कोळी हे दोघे महाविद्यालयीन तरूण-तरूणी एकत्रित दोघं बाईकवर चोपडा येथे येतात आणि चोपड्यात येऊन लुटमारीचा प्रकार करतात. या प्रकाराची येथे गेल्या दोन दिवसांपासून चर्चा रंगत आहे. त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला सुरुवात कशी व कुठे झाली? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या जोडीतील गिरिश सपकाळे घरी पालकांना मी सायन्समध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे, असे सांगत होता आणि तरुणी बीएस्सीच शिक्षण घेत असल्याचे भासवून महाविद्यालयात जात असल्याचे कारण सांगत इतर तालुक्यातही लुटमारीचे प्रकार दोघे करत असत.विवाह बंधनात पडण्यापूर्वी पडल्या बेड्यादोघांनी टी.व्ही.वरील क्राईम स्टोरी पाहून गुन्हेगारीकडे पाऊल टाकले. सुदैवाने दिया गॅस एजन्सी च्या संचालिका वैशाली पाटील यांचा गळा गिरीश दाबत असताना त्यांचा १२ वर्षाचा मुलगा प्रणित पाटील याने संशयित आरोपी गिरीश सपकाळे याचा पाय घट्ट पकडला त्यामुळे गिरीश गडबडला व पुढील अनर्थ टळला. ज्यावेळेस तरुण-तरुणी लोकांच्या गर्दीत सापडले त्यावेळेस या तरुणीने मित्र गिरीश याच्यावर पब्लिक मार पडत असताना त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात दोघांचा लग्नाचाही विचार होता असे नंतर समोर आले. परंतु विवाह बंधनात बांधले जाण्यापूर्वी त्यांच्या हातात बेड्या पडल्या.या दोघांचे पालकही उच्चशिक्षित असून नोकरीला आहेत आणि हे दोघे तरुण-तरुणी उच्चशिक्षित असूनही असा गुन्हा त्यांच्या हातून घडावा ही समाज मनाला विचारात टाकणारी बाब ठरत आहे.प्रणित ला शौर्य पुरस्काराने गौरवावेआपल्या घरात अनोळखी तरुण तरुणी येऊन अचानक आईच्या अंगावर स्प्रे मारीत आहेत, आईशी झटापट करीत आहे हे पाहून १२ वर्षीय प्रणितने बघ्याची भूमिका न घेता, प्रसंगावधान राखत आईला वाचविण्याचा प्रयत्न केला. प्रणितने स्वत: शौर्य दाखविले म्हणून त्याला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी अपेक्षा येथे व्यक्त केली जात आहे.
कॉलेजच्या फीचे पैसे खर्च झाले आणि....गिरीश सपकाळे याचा मावसभाऊ राहुल शिरसाठ मामलदे तालुका चोपडा येथील असून तो चोपडा येथे गॅस एजन्सीवर कम्प्युटर आॅपरेटर म्हणून कामाला होता आणि त्याच मावस भावामार्फत गिरीश गॅस एजन्सीवर संपकात आला. दिया गॅस एजन्सी चा दररोजचा बँक भरणा जवळपास ९० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत असतो. हे त्याने यापूर्वी पाहीले होते. यानंतर त्याचे विचार चक्र सुरू झाले की आपण येथे लुटमार करू शकतो. यात त्याला साथ मिळाली ती शास्त्र शाखेत शिकणारी तरुणी आणि मैत्रीण डिंपल कोळी हीची. डिंपल कोळीने गिरीशला साथ का दिली यामागील कारणे जाणून घेतले असता बीएससी चे शिक्षण घेत असताना महाविद्यालयात भरण्यासाठीचे फीचे पैसे तिच्याकडून खर्च झाले होते. या शिवाय स्वत:च्या मौजमजेसाठी मैत्रीणीकडून पन्नास हजार रुपये घेऊन तेदेखील तिने खर्च केले. आता पैसे फेडायचे कोठून ? असा प्रश्न तिला पडला होता व त्यातूनच तिने पैसे कमविण्याचा हा ‘शॉर्ट कट’ शोधत गिरीशला साथ देण्याचे ठरविले.
मावशीही पोलिसांच्या जाळ््यातजुना चोपडा येथील शिरपुर रस्त्यालगत असलेल्या महावीर सुपर शॉपसमोर एका अपार्टमेंट च्या तिस?्या मजल्यावर कट कारस्थान करून ५ रोजी लूटमार करण्याच्या प्रयत्नात अजून एक महिला आरोपी व डिंपल कोळी हिची नात्याने मावशी असलेली पल्लवी सोनवणे (३५) ही पोलिसांच्या जाळ्यात अडकली असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात असलेले गिरीश रवींद्र सपकाळे आणि डिंपल कोळी यांची पोलीस कोठडी दिनांक ७ रोजी संपणार होती. त्यांना पुन्हा पोलिसांनी चोपडा न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी एक दिवसाची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केल्यानंतर न्या. पी. बी. पळसपगार यांनी तिन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे, अशी माहिती गुन्ह्याचे तपास अधिकारी व शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी दिली. याबाबत मोठे रॅकेट आहे का? ही माहिती यातून समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.