लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने गुरुवारी फत्तेपूर, गोद्री व जळांद्री ग्रामपंचायतीची चौकशी केली. १५ व्या वित्त आयोगातील निधीबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने काही कागदपत्रे सोबत घेतल्याची माहिती समितीचे प्रमुख अतिरिक्त सीओ कमलाकर रणदिवे यांनी दिली.
सिंचन विहीर वाटपातील गैरव्यवहार, विस्तार अधिकारी प्रशासक असताना फत्तेपूर, गोद्री व जळांद्री ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत व पं.स.तील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील व पदाधिकारी यांनी चार दिवस उपोषण केले होते. यासाठी नियुक्त सहा सदस्यीय समितीने आज बीडीओ जे.वी. कवडदेवी यांच्यासह ग्रा.पं.ला भेट दिली. दोन दिवसांत अहवाल सीओंना सादर करणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.
खडकी बुद्रूकला तरुणाची
गळफास घेऊन आत्महत्या
चाळीसगाव : तालुक्यातील खडकी बुद्रूक येथील प्रवीण बिप्टा जाधव (३५) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
त्याचा भाऊ विलास जाधव यांनी प्रवीण यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नसून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.ना. मुकेश पाटील हे करीत आहेत.