लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल : बी.एस.एफचे जवान राहूल लहू पाटील यांचे पार्थिवावर रविवारी सकाळी १० वाजता एरंडोल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामलिला मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊन त्यांना शेवटचा निरोप देण्यात येणार आहे.
राहूल लहू पाटील यांचे पार्थिव घेऊन बी.एस.एफचे वाहन शनिवारी सायंकाळी ४:२० वाजता इंदूर येथून निघाले आहे. रविवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. दरम्यान दिवंगत जवान राहूल यांची पत्नी ज्योती पाटील यांनी 'आयुष्यभराचा जोडीदार,अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. राहूल पाटील यांचे मुळ गाव एरंडोल तालुक्यातील उत्राण(अ.ह.) हे आहे. जवळपास १८ वर्षांपासून त्यांचा परिवार गांधीपुरा भागातील शंकरनगर या नव्या वसाहतीत वास्तव्यास आहे. पितृछत्र त्यांच्या बालपणातच हरपले आहे.
आईने मोलमजुरी करून राहूल व दीपक या दोन्ही मुलांचे संगोपन केले. राहूल यांचा मोठा भाऊ दिपक लहू पाटील (३२), त्याची आई,पत्नी व मुलाबाळांसह एरंडोल येथे राहत आहेत. दीपक हा गँरेजवर काम करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवित आहे.
राहूलच्या परिवाराला त्याच्या लहानपणापासूनच गरीबीशी संघर्ष करावा लागत आहे. राहूल पाटील यांचे सासर देवळी-आडगाव ता.चाळीसगाव येथील असून ते १०वीला असतानाच लातूर येथे सन २००९ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले. अवघे ११वर्षे सेवा झाली असताना क्रुर काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांना दोन मुली आहेत. एक पाच तर दुसरी दोन वर्षाची आहे.
आमदार चिमणराव पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी शंकर नगरात जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
एक दिवसाआड व्हिडीओ कॉल
राहूल पाटील हे एकदिवसाआड व्हिडीओ कॉल करून त्यांचा आई, थोरला भाऊ दिपक इतर नातेवाईकांशी सुध्दा संपर्क साधत होते. दि. ४ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी व्हिडीओ कॉल करून आपण परिवारासह पुढील महीन्यात येत असल्याचे कळविले होते. हे त्यांच्याशी झालेले शेवटचे संभाषण होते.
भावपूर्ण श्रध्दांजली
जवान राहूल पाटील यांच्या मृत्यूची वार्ता एरंडोल शहरात पसरली असता जय-हिंद चौक, म्हसावद नाका, हिंगलाज कॉलनी, बुधवार दरवाजा, धरणगाव चौफुली यासह अनेक ठिकाणी बँनर्स लावून त्यांना विविध नागरीक, संस्था व संघटनांतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.