जळगाव : थोर रंगकर्मी बालगंधर्व आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या माध्यमातून जळगावला सांस्कृतिक श्रीमंतीचा वारसा लाभला आहे. हा वारसा शहरवासीयांनी पुढे न्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिराचे लोकार्पण सोमवारी त्यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. महाबळ रस्त्यावरील या भव्य नाट्यमंदिराचे लोकार्पण दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येवून लोकार्पण झाल्याचे घोषित केले.व्यासपीठावर त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, खासदार ए. टी. पाटील व रक्षा खडसे, आमदार एकनाथराव खडसे तसेच स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, उन्मेष पाटील, किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जळगावचे पहिले नगराध्यक्ष आबासाहेब म्हाळस यांचे भाचे बालगंधर्व यांचे बालपण येथेच गेले आहे. कवितांमधून मोलाचे विचार देणाऱ्या बहिणाबाईदेखील याच मातीतल्या. असा सांस्कृतिक श्रीमंतीचा वारसा सुवर्ण नगरी आाणि कापूस, केळीची नगरी असलेल्या जळगावला लाभला असून हा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी या नाट्यगृहात विविध चांगले कार्यक्रम व्हायला हवे. तर समाजाची संवेदना टिकवून ठेवण्यासाठी आणि माणसातले माणुसपण जागे ठेवण्याचे काम सांस्कृतिक वारशातून होत असल्याने हा वारसा पुढे नेणे गजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्रातले भव्य नाट्यगृहजळगावचे हे नाट्यगृह महाराष्ट्रातील चांगल्या चार- पाच नाट्यगृहांपैकी एक ठरावे, असे आहे. १२०० आसन व्यवस्था येथे असून ३० कोटी इतका खर्च या नाट्यगृहासाठी आला आहे, असे सांगून अशा भव्य नाट्यगृहास छत्रपती संभाजी राजे यांचे नाव दिल्याचा आनंदही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.प्रास्ताविकात गिरीश महाजन यांनी या नाट्यगृहामुळे जळगावच्या सौदर्यात भर पडली असल्याचे सांगितले. विद्यापीठाला बहिणाबार्इंच्या नामकरणाचा व संभाजीराजे नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळा एकाच दिवशी असल्याने हा दुग्धशर्करा योग असल्याचे ते म्हणाले.सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले. आभार आमदार सुरेश भोळे यांनी मानले.
सांस्कृतिक श्रीमंतीचा वारसा जळगावकरांनी पुढे न्यावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 5:46 PM
छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिराचे लोकार्पण
ठळक मुद्देमहाराष्ट्रातले भव्य नाट्यगृहनाट्यगृहामुळे जळगावच्या सौदर्यात भर