नशिराबाद : जुनं ते सोनं या म्हणी प्रमाणे बरी होती ग्रामपंचायत, असे म्हणण्याची वेळ नशिराबादकरांवर आली आहे. ऐन ग्रामपंचायत निवडणूक काळात नगरपंचायतीची उद्घोषणा झाली व निवडणुकीतून उमेदवारांनी सामूहिक माघार घेतली खरी, मात्र गावात प्रशासकीय कारभारात अनेक अडचणी येत असून नगरपंचाय कधी अस्तित्वात येणार, याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.
येथील ग्रामपंचायत निवडणूक १५ जानेवारीस जाहीर झाली होती. त्याच वेळी नगरपंचायतीची उद्घोषणा झाली. त्यामुळे पुन्हा-पुन्हा निवडणूक खर्च नको म्हणून ग्रामपंचायत निवडणूकच नको असा निर्णय घेत निवडूक रिंगणातील ८२ पैकी ८१ उमेदवारांनी सामूहिक माघार घेतली. मात्र अद्यापर्यंत नगरपंचायती संदर्भातली कुठलीही कार्यवाही किंवा मंजुरीची घोषणा होत नसल्यामुळे सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच निवडणुका लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यावेळी आपली ग्रामपंचायत निवडणूक झाली असती तर बरे झाले असते, आता केवळ प्रतीक्षाच आहे, ग्रामपंचायतच बरी होती असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दोन महिने झाले तरी प्रतीक्षा संपत नसल्यामुळे आणि गावाचा कारभार प्रशासकीय राजवटीत चालू असल्यामुळे अनेक समस्या कायम आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी निवडणूक न लढता व खर्च वाया न घालविता नगरपंचायत निवडणूक व्हावी त्यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्ते, उमेदवार एकत्र आले. नगरपंचायत व्हावी यासाठी सामूहिक माघारच वज्रमूठ बांधली. तरीदेखील अजून किती महिने नगरपंचायतीची प्रतीक्षा करावी लागेल? यावर खलबते सुरू आहे. ग्रामपंचायतीत सत्ताधारी नाही तर प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्यामुळे अनेक वार्ड पुढाऱ्यांना कामे करून घेत असताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ग्रामपंचायत कार्यालयासह पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडीत होण्यासह कर्मचाऱ्यांचे थकीत पगार, गावातील वाढते अतिक्रमण त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी आदी समस्या कायम आहे. आपल्या हाती सत्ताच नाही तर काय करणार, त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींचे हात बांधले गेले असल्याचे सांगितले जात आहे. गावाला आतापर्यंत तिसऱ्या प्रशासकांचीही नियुक्ती आहे.
नगरपंचायतमुळे गावाचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार हे मात्र तितकेच खरे, मात्र याची मंजुरी मिळणार केव्हा ? याची प्रतीक्षा कायम आहे.