जळगाव- शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीचा दुचाकीस्वार प्रौढाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली होती़ दरम्यान, रामानंदनगर पोलिसांनी अनिल लोटन ईशी (४६, रा़ खोटेनगर) याला १८ तासात अटक केली आहे.एका शाळेमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी मंगळवार, ३ रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाली़ १ वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असताना दुचाकीवरून एक प्रौढ आला व त्याने विद्यार्थिनीसह तिच्या सोबतच्या मैत्रीणींची विचारपूस केली़ नंतर ती विद्यार्थिनी काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या प्रौढाने तिचा पाठलाग करून तिला थांबविले व विनयभंग केला़ हा प्रकार जवळच असलेल्या एकाने पाहिला. त्याने शिवीगाळ करताच तिथून तो पळून गेला़ घरी आल्यानंतर विद्यार्थिनीने वडीलांना संपूर्ण हकीकत सांगितल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात दुचाकी क्रमांक मिळाल्यानंतर संशयिताची ओळख पटली़ ही दुचाकी अनिल ईशी याची असल्याचे समोर आले़पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे, प्रदीप चौधरी, विजय जाधव, शरद पाटील यांनी या आरोपीस खोटेनगरात अटक केली.
विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग करणारा १८ तासात गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 11:05 PM