सरपंच पतीसह बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील जि.प. शाळेला लागून असलेल्या एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर डी.वाय.एस.पी. कुमार चिंथा यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सात वाजता फिल्मी स्टाईल पद्धतीने छापा टाकला. या कारवाईत सरपंच पतीसह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाखोंचा माल देखील जप्त करण्यात आला आहे.
आव्हाणे येथील सरपंच पती भगवान नामदेव पाटील यांच्या शेतामध्ये अक्षय्यतृतीयेनिमित्त जुगार अड्डा बसवण्यात आला होता. याबाबत डीवायएसपी कुमार चिंथा यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आव्हाणे येथील त्या शेतामध्ये आपल्या पथकासोबत जाऊन जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी एकच पळापळ होऊन पोलीस व जुगार खेळणाऱ्यांमध्ये चकमक देखील झाली. काही जणांनी त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पत्र्याचे शेड चहूबाजूंनी घेरल्यामुळे जुगार खेळणाऱ्यांना पळ काढता आला नाही.
मोटारसायकलवर जाऊन टाकला छापा
डीवायएसपी कुमार चिंथा हे स्वतः सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर येऊन आव्हाणे भागात दाखल झाले. त्याआधी पोलिसांचे एक पथक केळीच्या बागेत तासाभर आधीच दबा घेऊन बसले होते. डीवायएसपीचे पथक दाखल झाल्यानंतर केळीमध्ये लपलेल्या पोलिसांनी देखील जुगार अड्डा असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. पूर्णपणे फिल्मी स्टाईल पद्धतीने ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे सर्व कारवाईत डीवायएसपी कुमार चिंथा हे सर्वात पुढे होते.
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
सरपंच पती भगवान पाटील, नामदेव पाटील, सोपान पाटील, हिरालाल चौधरी, अशोक पाटील, विजय पाटील, संजय सुभाष पाटील, संजय शांताराम पाटील, रावसाहेब चौधरी, आकाश पाटील, शिवनाथ चौधरी, यशवंत पाटील अशांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.