Ganesh Chaturthi 2018 : जळगावात आरास पाहण्यासाठी गणेश भक्तांची प्रचंड गर्दी, पावसाने उत्साहावर विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:14 PM2018-09-22T12:14:01+5:302018-09-22T12:14:35+5:30
विविध आरासची भुरळ
जळगाव : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने गणरायाच्या दर्शनासह सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आरास पाहण्यासाठी शुक्रवारी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. सायंकाळी ५ वाजेपासून भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. रात्री आठ वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली तरी भाविकांची गर्दी कायम होती. मात्र रात्री साडेनऊ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले.
गणेशोत्सवाचा शुक्रवारी नववा दिवस होता़ अवघ्या दोन दिवसांवर विसर्जन असल्याने सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबियांसह नागरिकांनी गर्दी केली़ गर्दीचा अंदाज घेवून नियोजन करण्यात आले होते़ शहरातील मध्यवर्ती भागातील सार्वजनिक मंडळातर्फे सायंकाळी पाच वाजेपासूनच देखावे खुले करण्यात आले होते.
सायंकाळपासून शहरात नागरिकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली़ नवीपेठेतील मंडळाजवळ खेळणे, बेन्टेक्सच्या वस्तूंसह खाद्यपदार्थाची दुकाने थाटली होती़ या दुकानांवर नागरिकांची गर्दी दिसून आली़
नेहरु बहुद्देशीय मंडळ, जय गोविंदा मित्र मंडळ, नवीपेठ, जय गणेश मित्र मंडळ, पंचरत्न मित्र मंडळ तसेच जनता बँकेचा गणपती हे सर्व शहरातील मध्यवर्ती भागात आहे़ या ठिकाणच्या मंडळासमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कोर्ट चौकापासून ते टॉवर चौकापर्यंतचे तसेच कोर्ट चौक ते चित्राचौकापर्यंतचे रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली होती. नवीपेठेला नागरिकांच्या गर्दीने यात्रेचे स्वरुप आले होते़ नजर जाईल तिकडे गर्दीच गर्दीच दिसून येत होती़
पावसामुळे पळापळ
रात्री आठ वाजेच्या सुमारास बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली तरी देखील गणेशभक्तांची गर्दी कायम होती. मात्र रात्री साडेनऊ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने भाविकांची चांगलीच धावपळ झाली. अनेक जण मंडळाच्या मंडपामध्येच थांबून होते तर कोणी गोलाणी मार्केट, नवीपेठेतील दुकानांचा आसरा घेत होते. अनेकांनी ओले होतच घरी जाणे पसंत केले.
आज शेवटचा दिवस
गणेशोत्सवातील शनिवार हा शेवटचा दिवस असून व त्यात ‘वीकेण्ड’ असल्याने गणेश भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. बुधवारपासून शहरातील गणेश मंडळामध्ये नागरीकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
आकर्षक रोशणाईने वेधले लक्ष
नेहरु चौक मित्र मंडळाच्यावतीने शुक्रवारी रात्री आराससमोर लेझर लाईट, शार्प लाईट, फोक मशिन (कृत्रिम धूर) यांचा वापर करून आकर्षक रोशनाई केली होती. या रोशनाईने लक्ष वेधून घेतले.