चोपडा : शिरपूर तालुक्यातील विखरण येथील साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक प्रल्हाद दगडू सोनार यांनी आपल्या घरी ब्लॅकबोर्डवर रंगीत खडूंच्या माध्यमातून श्री चित्रगणेश चित्रित केले. ते मूळचे चोपडा तालुक्यातील लासूर येथील रहिवासी आहे.पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक, थर्माकोल टाळले पाहिजे. त्याच बरोबर सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारात आलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूती व शाडू माती हा पर्यायही तेवढाच घातक आहे. कारण शाडू माती तयार करतांना वापरलेल्या रसायानामुळे शाडू मातीचा थरसुद्धा साध्या मातीत एकरुप होत नाही. यासाठी गाळाची माती वापरून गणेशमूर्ती तयार करणे हा पर्याय योग्य आहे. परंतु सोनार यांनी आपल्या घरी काळ्या फळ्यावर रंगीत खडूंच्या माध्यमातून श्री चित्रगणेश चित्रित केला आहे़ त्यासाठी त्यांना सलग सात तास फलकलेखन करुन चित्र साकारले. रंगीत खडूंमुळे कोणतेही नुकसान होत नाही. शंभर टक्के प्रदुर्षण मुक्त गणरायाची निर्मिती करुन आपल्या घरी स्थापना केली आहे. त्यामुळे एक वेगळा मार्ग त्यांनी भाविकांसाठी दाखविलेला आहे. गेल्या काही वर्षापासून ते हा उपक्रम राबवित आहेत़ आपणही आपल्या घरी फलकावर, कागदावर किंवा कापडावर असेच चित्रण करुन जर श्री गणेशाची स्थापना केली तर पर्यावरण सांभाळण्यासाठी प्रत्येकाची मदत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कलाशिक्षकाने केली चित्र गणेशाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:12 PM