जळगाव : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. चार महिने बंद असलेल्या बाजारपेठेतही आता ग्राहकांच्या प्रतिसादामुळे चैतन्य आले आहे. जी. एस. ग्राऊंड आणि सागर पार्क या दोन्ही मैदानावर गणेशमूर्ती तसेच सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल सजले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक अडीअडचणींवर मात करत बाजारपेठ सुरु झाली आहे. या बाजारपेठेला गणराया पावणार असे संकेत सध्याची ग्राहकांचा प्रतिसाद पाहिल्यावर मिळत आहे. बाजारपेठ उशिरा सुरु झाल्यामुळे यंदा केवळ तीन दिवस अगोदर दुकाने गणेशोत्सवाच्या साहित्याने सजल्याचे दिसून आले. यंदा चीनी बनावटीच्या वस्तूंकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. सजावटीसाठी लागणारे वीज साहित्य तसेच विविधरंगी कृत्रिम फुलांच्या माळा, मखर आदी साहित्यामुळे बाजारपेठेने नवीन रूप धारण केले आहे.गणेशमूर्तीच्या विक्रीचे स्टॉलही आता ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. यंदा १७५ रुपयांपासून मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. जी. एस. ग्राऊंड तसेच सागर पार्क याठिकाणी गणेशमूर्ती विक्री तसेच सजावटीच्या साहित्याचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. गुरुवारपासून याठिकाणी विक्रीला प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी हरितालिका असल्याने त्यासाठी लागणारे साहित्यही गुरुवारी विक्रीला येण्याची शक्यता आहे.- शुक्रवारी हरितालिका असल्याने गुरुवारपासूनच खरेदीसाठी प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी श्रीगणेश चतुर्थी असल्याने तीन दिवस बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी उसळू शकते. यद्दष्टीने बाजारात वस्तू विक्रीसाठी आणल्या जात आहेत.
गणेशोत्सवाने बाजारपेठेत आले चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 12:15 PM