संजय पाटीलअमळनेर : अपवादात्मक तिथीला आठव्या दिवशी धामधुमीत विसर्जन करणाऱ्या मंगरूळ गावाच्या पोलीस पाटलाच्या प्रयत्नाने यंदा कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून एकही सार्वजनिक गणपती स्थापन न झाल्याने यंदाचा गणेशोत्सव ध्वनी व हवेच्या प्रदूषणमुक्त झाला आहे.मंगरूळ गावात १२ ते १३ सार्वजनिक गणेश मंडळ असायचे. विसर्जनाच्या दिवशी कर्कश आवाजात मंगरुळकर बेधुंद होऊन नाचायचे. गुलाल भरमसाठ प्रमाणात उधळला जायचा. विद्युत रोषणाईने संपूर्ण गावात झगमगाट असायचा. आठव्या दिवशी मंगरूळ व्यतिरिक्त कुठेही विसर्जन नसल्याने अमळनेर तालुक्यातील लोक येथील गणपती मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी करत असत. पोलीस आणि प्रशासनाला विसर्जन होईपर्यंत चिंता असायची. एक विशेष शांतता बैठक या गावासाठी घ्यावी लागत होती. अनेकदा एक गाव एक गणपतीसाठी प्रयत्न केले गेले, मात्र भक्तीच्या जिद्दीपुढे ते फोल ठरले होते. यंदा मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पोलीस पाटील भागवत बापू पाटील यांनी ग्रामस्थांना विनंती केली आणि ग्रामस्थांनीदेखील सकारत्मक प्रतिसाद देऊन सार्वजनिक गणपती स्थापन करायचा नाही, असे सर्व मंडळांनी ठरवले.मिरवणूक, बँड, ढोल, ताशा, गुलाल हा वायफळ खर्च वाचवला आहे. विशेष म्हणजे एकही पोलिसांची बैठक घ्यायची गरज पडली नाही. ग्रामस्थांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलाचे हे परिणाम असल्याचे पोलीस पाटील भागवत पाटील यांनी सांगितले तर पोलीस प्रशासनानेदेखील मंगरूळ गावच्या नागरिकांचे कौतुक केले आहे.
मंगरुळचा गणेशोत्सव - आर्थिक बचतीसह ध्वनी व हवेच्या प्रदूषणापासून झाला मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 4:55 PM
एकही सार्वजनिक गणपती स्थापन न झाल्याने यंदाचा गणेशोत्सव ध्वनी व हवेच्या प्रदूषणमुक्त झाला आहे.
ठळक मुद्देयंदा कोरोनापासून बचावासाठी मंगरूळला एकही सार्वजनिक गणपती नाहीग्रामस्थांनीदेखील सकारत्मक प्रतिसाद देऊन सार्वजनिक गणपती स्थापन करायचा नाही, असे सर्व मंडळांनी ठरवलेमिरवणूक, बँड, ढोल, ताशा, गुलाल हा वायफळ खर्च वाचवला आहेग्रामस्थांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलाचे हे परिणाम : पोलीस पाटील भागवत पाटील