जळगाव : सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे आगमन दोन महिन्यांवर आले आहे. मात्र यंदा हा उत्सव साधेपणानेच, पण भक्तीभावाने साजरा केला जाणार आहे. लहान मूर्ती, सुरक्षित अंतर राखून केले जाणारे कार्यक्रम अन् विशेष डामडौल न करता भक्तीभाव जपून कोरोनाशी दोन हात करण्याचा संकल्प यंदा गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. कोरोना जगातून समूळ नष्ट करण्यासाठी विघ्नहर्त्याला साकडे घातले जाणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा दरवर्षीप्रमाणे राज्यासाठी आदर्शवत ठरणार आहे.अजूनही गणेशोत्सवाला दोन महिने बाकी आहेत. मात्र, दरवर्षी दोन महिने अगोदरपासूनच या लाडक्या सार्वजनिक उत्सवाची तयारी सुरु असते. आकर्षक गणेशमूर्तीसाठी मागणी नोंदवली जाते, कोणते कार्यक्रम घ्यायचे, मिरवणुकीचे नियोजन कसे करायचे? याबाबत चर्चा, बैठका रंगत असतात. पण यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करायचा मात्र भक्तीभावामध्ये कोणताही खंड पडू द्यायचा नाही, असे निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने घेतला आहे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून हा उत्सव साजरा करण्यावर भर राहणार आहे.दरम्यान, याबाबत महत्वाची बैठक अजून पार पडावयाची आहे. ही बैठक झाल्यानंतर मूर्तीबाबत तसेच कार्यक्रम, यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाळावयाची आचारसंहिता यावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर यंदा गणेशोत्सव काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कितपत राहिल, याचा विचार करून एक आदर्श आचारसंहिता तयार केली जाणार आहे.गणेशोत्सवाचा जळगाव पॅटर्न राज्यभरातसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा ‘जळगाव पॅटर्न’ हा संपूर्ण राज्यात प्रसिध्द आहे. याठिकाणी प्रशासनाने काही आचारसंहिता घालून देण्याअगोदरच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ प्रत्येक मंडळाला आचारसंहिता घालून देते. मंडळांबरोबरच कार्यकर्तेही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करताना या आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेतात. त्यामुळे अन्य जिल्ह्यांमध्ये या काळात सुरक्षा यंत्रणांवर असणारा ताण जळगावात मात्र दिसत नाही. त्यामुळे हा ‘जळगाव पॅटर्न’ राज्यात आदर्शवत झाला आहे.काय असतील सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत संभाव्य आचारसंहिता?1 गणेशमूर्ती रेखीव; परंतु ती लहान असावी. दरवर्र्षासारखी मोठी असू नये आणि जास्त करून मूर्ती शाडूच्याच असाव्यात.2 सामाजिक अंतराचे भान गणेशोत्सवातील प्रत्येक कार्यक्रमात भान ठेवले जाईल. कोणतीही गर्दी होणार नाही, याची काळजी त्या त्या गणेशोत्सव मंडळाला घ्यावी लागेल.3 उत्सवावर कमीत कमी खर्च करून तो खर्च धार्मिक कार्यक्रम वा सामाजिक बांधिलकीवर खर्च करण्यात यावा.गणेशोत्सवापूर्वी सर्व मंडळाची एकत्र बैठक होईल आणि त्यामध्ये सर्व नियम ेठरवले जातील, त्याचे पालन सर्वांना करावे लागेल. सर्वांशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल. आमचे मंडळही महामंडळाच्या सर्व नियमांना अनुसरुन हा गणेशोत्सव साजरा करेल.-मोहन तिवारी, सचिव, जयमायकादेवी मित्रमंडळगणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचा खंड पडू न देता तो साधेपणाने, मात्र भक्तीभावाने साजरा करण्यावर महामंडळाचा भर राहणार आहे. आम्ही गणेशोत्सवापूर्वी आदर्श आचारसंहिता तयार करणार आहोत. त्या आचारसंहितेचे प्रत्येक गणेशोत्सव मंडळ पालन करेल. आम्ही सर्व सुशिक्षित कार्यकर्ते आहोत, त्यामुळे या काळात गणेशोत्सवाची धमाल करतानाच अतिशय शिस्तबध्द आणि कोरोनाचा फैलाव टाळून सर्व काही नियोजन केले जाणार आहे.-सचिन नारळे, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव महामंंडळ, जळगाव.
कोरोनाशी लढतच यंदा होणार गणेशोत्सवाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:59 AM