जामनेर, जि.जळगाव : १०० टक्के भरलेल्या वाघूर धरणामुळे गंगापुुरी, ता.जामनेर बॅकवॉटरच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या १० वर्षांपासून होत असलेली पुनर्वसनाची मागणी ग्रामस्थांनी पुन्हा केली आहे. पुनर्वसनाबाबत प्रशासनाने गांभिर्याने दखल न घेतल्यास विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे निवेदन एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी तहसीलदार अरुण शेवाळे याना दिले.सुमारे १ हजार लोकवस्तीचे गंगापुरी गाव जामनेर-भुसावळ रस्त्यावर सूर नदी काठावर आहे. गावात आदिवासी मुलांची आश्रमशाळा आहे. गावाला तीन बाजूंनी वाघूर धरणाच्या बॅकवॉटरचा विळखा आहे. वाघूर प्रकल्पाचे काम सुरू असतानाच संभाव्य धोका लक्षात घेऊन तत्कालिन अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे पुनर्वसनाची मागणी केली. २०१५ मध्ये ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात गावाला संरक्षण भिंत न बांधता गावाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली होती. या निवेदनाला अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी वाघूर धरण विभागातील कार्यकारी अभियंता यांना पाहणी करून अहवाल देण्याचे कळविले होते. पुनर्वसनाबाबत ग्रामस्थांनी तत्कालिन आमदार गिरीश महाजन यांनादेखील पुनर्वसनाबाबत विनंती केली होती.प्रशासनाच्या लाल फितीत पुनर्वसनाचा प्रस्ताव अडकल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. गावाला पाण्याचा विळखा पडल्याने साथीचे रोग बळावण्याची शक्यता वाढली आहे. येथे आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती असून, मृत्यूनंतर दफनविधी करावा लागतो. पाण्यामुळे खड्डा खोदणेदेखील मुश्किल झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आश्रमशाळेत ४०० विद्यार्थी असून साचलेल्या पाण्यातून सॅप, विंचू निघत असल्याने त्यांचे जीवन असुरक्षित होत आहे.पुनर्वसनाबाबत तातडीने निर्णय न झाल्यास शासकीय कार्यक्रमात सहभाग नोंदविणार नाही व मतदानावर बहिष्कार टाकू, असे निवेदनात म्हटले आहे. संघटनेचे विलास मोरे, प्रवीण ठाकरे, सीताराम सोनवणे, रामचंद्र सोनवणे, उषा चव्हाण, मिठाराम मोरे, लीलाबाई मोरे, बाळू सोनावणे, विमलबाई मोरे, दीपक जोशी, ममराज राठोड, राजू खरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
गंगापुरी गाव वाघूरच्या बॅकवॉटरच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 5:52 PM
१०० टक्के भरलेल्या वाघूर धरणामुळे गंगापुुरी, ता.जामनेर बॅकवॉटरच्या विळख्यात सापडले आहे.
ठळक मुद्देपुनर्वसन कराअन्यथा मतदानावर बहिष्कार