जळगाव : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) व रासायनिक रंगांच्या वापरामुळे जल प्रदुषण होत असल्याने पर्यावरणपूरक गणपती तयार करण्याकडे कल वाढला आहे. दुसरीकडे पर्यावरणाचा ऱ्हास टाळला जावा तसेच घरातील विहीर आणि पाण्याच्या कुंडात श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करता यावे यासाठी इको-फ्रेंडली व शाडू, तुरटीच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. यंदा बाजारात गो-मातेच्या शेणापासून तयार झालेल्या श्रीगणेश मूर्ती सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत.
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाला अजून नऊ दिवसांचा अवधी आहे. मात्र, बाजारपेठेत गणेश मूर्तींसह सजावटीचे साहित्य दाखल झाल्याने आतापासूनच चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या बाप्पाचे स्वागत करताना सजावटीसाठी पर्यावरणपूरक आरास बनविण्याकडे व्यावसायिकांचा कल आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावरही पाणी पडले होते. परंतु, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. शहरात अनेक ठिकाणी आता पर्यावरणपूरक शाडू मातीची, तुरटीची तसेच लाल मातीची व शेणापासून तयार गणेशमूर्तींचे स्टॉल लागले आहेत. सध्या गणेशोत्सवही पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याकडे अनेकांचा कल आहे. यामुळे व्यावसायिकांकडूनही त्यास साजेशा पर्यावरणपूरक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या
गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. घरोघरी गणरायाचे आगमन होणार असल्याने प्रत्येक जण सजावटीला अधिक महत्त्व देतात. महामार्गावर सुद्धा विविध प्रकारातील फुलांच्या माळा विक्रीला आल्या आहेत. वजनाने हलक्या आणि धुण्यायोग्य असल्याने त्यांचीही मागणी वाढली आहे. दुसरीकडे आजही घरांमध्ये विविध देखावे तयार केले जातात. काहींनी देखावे बनविण्याच्या कामाला सुरुवातही केली आहे.