लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कणभर सोनेदेखील असले तरी त्याचे मोल असतेच. सुवर्णबाजारत सुवर्णपेढ्यांनजीक हे कणभर सोने सापडले तरी दररोजच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटून ६० ते ७० कुटुंबाला या सोन्यामुळे आधार मिळतो. मात्र अनेक वेळा हाती काहीच लागत नाही व रिकाम्या हाताने माघारी परतावे लागल्याने अनेकांची निराशा होते.
जळगावातील सुवर्ण व्यवसाय प्रसिद्ध असून सुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या या ठिकाणी सुवर्ण व्यवसायातून अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. याच सोन्याने गरीब कुटुंबांच्याही पोटापाण्याला हातभार लागत आहे.
सुवर्ण अलंकार घडविताना अथवा त्याचे तुकडे करून विक्री करीत असताना सोन्याचे काही कण खाली पडतात. हे कण साफसफाई करताना कचऱ्यात जातात. तसेच सुवर्णपेढ्यांशेजारी असलेल्या गटारीमध्येही पडतात. त्यामुळे या सोन्याच्या कणांवर पोट भरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
सकाळी सुरू होतो शोध
जळगावातील ६० ते ७० जण दररोज सकाळी सुवर्ण बाजार परिसरात येऊन कचरा, गटारीमध्ये या सोन्याचा शोध घेत असतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यामध्ये सोन्याच्या कणांचा शोध घेताना बराच वेळ घालवावा लागतो. तसेच गटारींमध्ये पाणी अडवून त्यातील गाळामध्ये सुवर्ण कणांचा शोध घेतला जातो. त्यातून एका जणाला ५० ते ६० मिली ग्रॅम सोने सापडते व त्याचा मोबदलाही कमी दराने मिळतो, असे या मंडळींनी सांगितले. दिवसभरात १५० ते २०० रुपये एकाच्या वाट्याला येतात.
कचऱ्याच्या मातीतून किती मिळते सोने?
सोन्याचा शोध घेत असताना केवळ ५० ते ५० मिली ग्रॅम सोने सापडते. त्यातून कसेबसे १५० ते २०० रुपये हाती येतात.
- विनोद सपकाळे
कधी काहीही हाती पडत नाही
पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज सकाळी सुवर्ण बाजारात येऊन कचरा, गटारींमध्ये सोन्याच्या कणांची शोध घेतो. यात अनेक वेळा हाती काहीच लागत नसल्याचे एका तरुणाने सांगितले.