पाल/रावेर : गारबर्डी धरण पाड्याला गावठाण दर्जा देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिला आहे.
नाशिक विभागीय आयुक्तांचा रावेर तालुक्यातील आदिवासी भागातील पाहणी दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पाल, निमड्या, गारबर्डी धरण व धरणपाड्यावर भेट देऊन पाहणी केली. प्रारंभी डॉ. राऊत व डॉ. बी. एन. पाटील यांनी आदिवासी क्षेत्रातील पाल ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांचे तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. बी. बारेला व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील यांनी स्वागत केले.
दरम्यान, त्यांनी पाल कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. पाल कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. महेश महाजन व सातपुडा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अजित पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
निमड्या व गारबर्डी ग्रुप ग्रामपंचायतीत ९९ पैकी १० आदिवासी बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजूर झालेले वनपट्टे व शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी गारबर्डी येथील शबरी घरकूल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांची पाहणी करून समाधान व्यक्त केलेे तद्नंतर, त्यांनी वनविभागाच्या गारबर्डी येथील रोपवाटिकेला भेट देऊन समाधान व्यक्त केले.
धरण परिसरातील आदिवासी पाड्यावरील रहिवाशांशी जिल्हाधिकाऱ्यांनी हितगुज साधून गावठाणचा महसुली दर्जा देण्यासंदर्भात सुकी मध्यम सिंचन प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता महेश पाटील यांच्याशी चर्चा करून प्राप्त परिस्थितीचा आढावा घेतला.
फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या दालनात कार्यालयात रावेर व यावल तालुक्यातील प्रशासनाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. गौणखनिज वाहतूक, महाआवास अभियान, वसुंधरा अभियान, जलशक्ती अभियान आदी महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.