लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या सहा महिन्यांपासून गॅसची सबसिडी मिळालेली नाही. दर सहाशेच्या खाली गेल्यावर केंद्र शासनाने ही सबसिडी बंद केली आहे; मात्र त्यानंतर गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढले. तरीही केंद्र शासनाने एकदाही गॅसची सबसिडी ग्राहकांना दिलेली नाही. सध्या जळगाव जिल्ह्यात घरगुती वापराच्या गॅसचा दर ७७४ रुपये आहे.
सध्या जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्कील होऊन बसले आहेत. पेट्रोल, डिझेलपाठोपाठ घरगुती वापराच्या गॅसचे दरदेखील वाढले आहेत. त्यात सरकार नागरिकांना दिलासा देण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. पेट्रोल शंभरच्याजवळ तर डिझेल ९० च्या जवळ पोहोचले आहे. त्यासोबतच आता घरातील एलपीजी सिलिंडर ८०० च्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे एका महिन्याच्या सिलिंडरसाठी जादाचे पैसे मोजावे लागत आहेत. उज्ज्वला योजनेत ज्यांना गॅस जोडणी मिळाली, त्यांना आता गॅस परवडेनासा झाला आहे. त्यामुळे त्यांनीदेखील पुन्हा चुलीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
सामान्य अडचणीत
आधीच कोरोनाच्या काळात अनेकांचा रोजगार बुडाला होता. गेल्या काही महिन्यात नागरिक त्या चिंतेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच सातत्याने महागाईची झळ बसत असल्याने नागरिक वैतागले आहेत. एप्रिल महिन्यापासून सबसिडी जमा न झाल्याने नागरिकांची कोंडी झाली आहे.
कोट-
गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचे दर वाढत आहेत. आधीच कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. सरकारने त्यावर नियंत्रण मिळवावे - किरण मराठे
-----
गॅस सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. सिलिंडर घेतला तर आठशे रुपये मोजावे लागतात; मात्र त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. कोरोनाच्या काळात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. - प्रवीण पाटील.
गॅस सिलिंडरचे दर
जानेवारी २०२० - ७१४.५०
जुलै २०२० - ५९९.५०
फेब्रुवारी २०२१ - ७७४.५०
जानेवारी २०२१ - ६९९.५०