जळगाव : गेल्या वर्षभरात घरगुती गॅसच्या दरात २४० रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र याच दरम्यान गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी पूर्णपणे बंद झाली. गॅसचे भाव २०१९ च्या सुमारासदेखील जास्त होते. मात्र वाढलेल्या भावावर लगेचच बँक खात्यात सबसिडी जमा होत होती. त्यामुळे नागरिकांना फारसा आर्थिक बोजा पडत नव्हता. कोरोनाच्या काळात पहिल्या लॉकडाऊनमध्ये शासनाने गॅस सिलिंडरचे दर एकदम कमी केले. मात्र त्यासोबतच सबसिडी देणे बंद केले आहे. नंतर भाववाढ झाली तरी सबसिडी काही मिळायला सुरुवात झालेली नाही.
शहरात चूल कशी पेटवू?
गॅसचे भाव वाढलेले असले तरी शहरात चूल कशी पेटवावी हा प्रश्न आहे. पाणी तापवण्यापासून सर्वच कामांना गॅस वापरावा लागतो. गॅसच्या वाढलेल्या दरामुळे आता पुन्हा सरपण गोळा करायची वेळ लवकरच येईल. सरकारने लवकरात लवकर गॅसचे दर कमी करावे. त्यामुळे महागाईत दिलासा मिळेल. - रूपाली पाटील
गॅस सिलिंडर आता ८४० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे घराचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. सर्वच ठिकाणी भाववाढ होत असल्याने करायचे काय, गॅसचे दर वाढले तरी घरात फारशी जागा नसल्याने चूलदेखील पेटवता येत नाही. चूल पेटवण्यासाठी सरपण आणायचे तरी कोठून हा प्रश्न आहे - मंगला वाणी
घरगुती इंधन दर सबसिडी शून्य
जुलै २०२० ५९९.५०
ऑगस्ट २०२० ५९९.५०
सप्टेंबर २०२० ५९९.५०
ऑक्टोबर २०२० ५९९.५०
नोव्हेंबर २०२० - ५९९.५०
डिसेंबर २०२० - ६४९.००
------------------
जानेवारी २०२१ - ६९९.५०
फेब्रुवारी २०२१ - ७२४.५०
मार्च २०२१ - ८२४.५०
एप्रिल २०२१ - ८१४.५०
मे २०२१ - ८१४.५०
जून २०२१ - ८१४.५०
जुलै २०२१ - ८४०