लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गॅस दाहिनी बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आठवडाभरात या गॅस दाहिनीचे लोकार्पण केले जाणार आहे. गेल्या सात महिन्यांपासून नेरी नाका स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवण्याचा कामाला सुरुवात झाली होती. अखेर काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. भविष्यात या गॅस दाहिनीमुळे मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार करता येणार असून, लाकूड व इतर इंधनाचा खर्चदेखील वाचणार आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मृतांची संख्यादेखील वाढत होती. जून महिन्यात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शहरात मनपाच्यावतीने विद्युतदाहिनी बसविण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचना देऊनही मनपा प्रशासनाने फारसे लक्ष दिले नव्हते. त्यानंतर तत्कालीन स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी केशव स्मृती प्रतिष्ठानच्या सहकार्याने स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविण्याचा प्रस्ताव दिला होता. केशव स्मृती प्रतिष्ठाननेदेखील मनपाचा प्रस्ताव मान्य करत कामाला सुरुवात केली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केशवस्मृती प्रतिष्ठानने शहरात गॅस दाहिनी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. या सभेत प्रस्तावाला मंजुरीदेखील देण्यात आली होती. मात्र मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर हा प्रस्ताव रखडला होता. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर मनपाने केशवस्मृती प्रतिष्ठानच्या संचालकांशी चर्चा करत, आवश्यक मशिनरी उपलब्ध करून दिली. आठवडाभरात हे काम पूर्ण होणार आहे.
विशेष बाबी
गॅस दाहिनीसाठी अंदाजे ५० लाखांपर्यंतचा खर्च लागला आहे.
एका मृतदेहावर ४५ मिनिटात अंत्यसंस्कार होणार आहेत.
एका दिवसात १० ते १५ मृतदेहावर होऊ शकतात अंत्यसंस्कार
लाकडांसह इतर इंधनाचा खर्च वाचणार
मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी नाममात्र शुल्क संस्थेकडून आकारले जाणार आहे.