सध्या मार्गशीर्ष मास सुरू आहे. १९ डिसेंबर, बुधवारी रोजी गीताजयंती साजरी होत आहे. गीतेची व्याख्या माऊलींनी १५ व्या अध्यायात केलेली आहे.साचचि बोलाचे नव्हे हें शास्त्र ! पै.संसारू जिणतें हे शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्रा अक्षरे इये ।।खरोखरच गीता हे (नुसते) शब्द पांडित्याचे शास्त्र नाही. तर ही गीता संसार जिंकणारे शस्त्र आहे. (फार काय सांगावे) या गीतेची ही अक्षरे आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत. श्रीमद् भगवत गीता हा विश्ववंदनीय ग्रंथ आहे.वारकरी परंपरेत काही आचारसंहिता आहेत. एक ठराविक वाड:मयाला जास्त महती आहे. संत तुकारामांच्या भाषेतगीता भागवत करीती श्रवण ।अखंड चिंतन विठोबाचे ।।गीता व भागवत हे दोन पौराणिक ग्रंथ वारकरी परंपरेत महत्वाचे मानले जातात. या ग्रंथाचे श्रवण व विठोबाचे चिंतन महत्वाचे मानले जाते. भारत खंड हा खरोखरच भाग्यवान आहे की, या खंडात भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला व विश्ववंदनीय गीतेचा जन्म झाला. आपल्या संस्कृती व परंपरेचे वर्णन करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते, ती म्हणजे हजारो वर्षापासून या भूमीत ज्ञानाची पूजा केली जाते आणि अंतिम सत्याचा शोध घेतला गेला. संपूर्ण विश्वामध्ये ज्ञान हेच सत्य आहे. तसेच या विश्वाचे एक अंतिम चैतन्य स्वरुप हे सुद्धा ज्ञान स्वरुपच आहे. या महान ग्रंथावर संत ज्ञानेश्वरी माऊलींनी बाराव्या शतकात मराठीत भाष्य केले. संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत.गीत अलंकार नाम ज्ञानेश्वरी ।ब्रह्मानंद लहरी हेलावली ।।ज्ञानेश्वर माऊलींनी या विश्ववंदनीय ग्रंथावर मराठी भाषेत आपल्यासाठी वैदीक तत्वज्ञान, धर्म संकल्पना, अध्यात्मशास्त्र यावर सखोल असे चिंतन केले. श्रीमद् भगवतगीता व त्यावर माऊलींचे केलेले भाष्य हे खरे म्हणजे धर्मकीर्तन आहे. धर्म म्हणजे कर्तव्य असा अर्थ बऱ्याच तत्ववेत्यांनी सांगितला आहे. यातील रहस्य उलगडून बघावे लागते.‘अहा बोलाची वालिफ फेडिजे’असे स्पष्ट ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे. गीतेतील किंवा ज्ञानेश्वरीतील शब्दांच्या बाहेरील आवरण म्हणजे साली काढून शब्दांच्या मूळ अर्थाचा गर पाहणे आवश्यक आहे. म्हणूनच वरीलप्रमाणे गीतेची व्याख्या माऊलींनी केली आहे. आपल्या देशात सर्वसमावेशक अशी ‘वसुधैव कुटुंबकम’-संपूर्ण जग हे एक कुटुंबच आहे. जीवनप्रणाली आहे.श्रीमद् भगवतगीता हा ‘जीवनग्रंथ’ म्हणून ओळखला जातो. प्राचीनकाळी धर्मयुद्धासाठी कौरव-पांडव उभे ठाकले असताना आपले आत्मस्वकीय, गुरूजन, ऋषिमुनींनी हत्या करण्याच्या कल्पकतेने अत्यंत व्यथित झालेल्या महापराक्रमी अर्जुनाला नैराश्याच्या आणि वैफल्याच्या गर्तेत सापडलेल्या आपल्या परम मित्रास त्याच्या धर्मकर्तव्याची, अधर्माविरूद्ध कृती करण्याची जाणीव, भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिव्य वाणीतून करून दिली, त्याच दिव्य आणि ज्ञान विज्ञानधिष्ठित अशा उपदेशाला ‘श्रीमद् भगवत गीता’ असे संबोधले जाते.- डॉ. कैलास पाटील, डेप्युटी जनरल मॅनेजर - एच.आर.,चॅसिस ब्रेक्स इंटरनॅशनल.
गीता - भागवत करीती श्रवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 8:11 PM