जळगाव: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने शुक्रवारी दुपारी दोन वाजता जि. प. शाहु महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. विरोधकांनी सभा त्याग केल्यानंतर ऑफलाईन होणारी ही पहिलीच सभा असल्याने विरोधकांच्या भूमिकेकडे या सभेत लक्ष राहणार आहे. नवनियुक्त सीईओ डॉ. पंकज आशिया यांची ही पहिलच सभा राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्या या सभेत वीस विषय ठेवण्यात आले असून आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यात मेढा या एजन्सीकडून झालेल्या कामांबाबत सदस्य आक्रमक भूमिका मांडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन शाळांवर या यंत्रणेवरच सावली असल्याने सर्व २३६ कामांची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. दरम्यान, विरोधकांसोबतच सत्ताधारी गटाचे काही सदस्यही गेल्या काही सभांमध्ये आक्रमक भूमिका मांडत आहेत. शिवाय कोरोना काळात ऑनलाईन झालेल्या सभेत विरोधी सदस्यांनी थेट सभात्याग करून गंभीर आरोप केले होते. आता या सभेत त्यांची भूमिका नेमकी काय राहणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.