जळगाव : जळगावहून पाचोऱ्याकडे जाणाऱ्या मालगाडीच्या चाकातून ‘धूर’ निघत असल्याचे दिसताच, म्हसावद स्टेशनजवळील गेटमनने तात्काळ म्हसावद स्टेशन मास्तरांना घटनेची माहिती दिली. तर म्हसावदच्या स्टेशन मास्तरांनी ही मालगाडी थांबविण्यासाठी माहेजीला कळविले. माहेजीच्या स्टेशन मास्तरांनी तात्काळ या प्रकाराची माहिती भुसावळ नियंत्रण कक्षाला कळवून, नियंत्रण कक्षातर्फे या गाडीला परधाडे स्टेशनला थांबविण्यात आले. गेटमनच्या प्रसंगावधानामुळे या मालगाडीचा अपघात टळला आहे. या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेस व गीतांजली एक्सप्रेस गाड्या उशिराने धावल्या.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जळगावहून पाचोऱ्याकडे जाणाऱ्या मालगाडीच्या चाकातून मोठ्या प्रमाणावर ‘धूर’ निघत असल्याचे म्हसावद स्टेशनवरील गेटमन गोविंदा पाटील यांच्या लक्षात आले. रेल्वेच्या भाषेत याला (हार्ट ॲक्सेल) असे म्हटले जाते. धावत्या गाडीचे ‘चाक’ गरम होऊन, त्यातून धूर निघतो व चाक बाहेर येऊन अपघात घडण्याची शक्यता असते. हा प्रकार गोविंदा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता म्हसावदच्या स्टेशन मास्तरांना घटनेची माहिती दिली. या मालगाडीने म्हसावद स्टेशन पार केल्यामुळे, म्हसावदच्या स्टेशन मास्तरांनी ही मालगाडी थांबविण्यासाठी माहेजीच्या स्टेशन मास्तरांना कळविले. त्यानंतर माहेजीच्या स्टेशन मास्तरांनी तात्काळ भुसावळ नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर नियंत्रण कक्षातर्फे वेगाने धावणारी ही गाडी परधाडे स्टेशनला थांबविली.
इन्फो :
पाचोऱ्याला ‘चाक’ निखळणारा डबा केला वेगळा
परधाडे स्टेशनवर ही मालगाडी थांबल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ‘धूर’ निघत असल्यामुळे जे ‘चाक’ निखळणार होते. त्या चाकावरील मालगाडीचा एक डबा बाजूला काढण्यासाठी सर्व यंत्रणा तयार ठेवली होती. मात्र, हा डबा बाजूला करण्यासाठी परधाडे स्टेशनला पर्यायी रेल्वे लाइन नसल्यामुळे, ही मालगाडी संथगतीने पाचोरा स्टेशनवर आणण्यात आली. या ठिकाणी पर्यायी लाइनवर ही मालगाडी उभी करून, ‘चाक’ निखळणारा हा डबा वेगळा करण्यात आला व त्यानंतर पाऊण तासाने ही गाडी चाळीसगावकडे रवाना करण्यात आली.
इन्फो :
म्हसावद स्टेशनवरील गेटमन गोविंदा पाटील यांंना मालगाडीत ‘हार्ट ॲक्सेल’चा तांत्रिक प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, त्यांनी तात्काळ संबंधितांना माहिती देऊन, होणारी दुर्घटना यामुळे टाळता आली. पाचोरा स्टेशनवर या मालवाडीचे ‘हार्ट ॲक्सेल’मुळे जे ‘चाक’ निखळणार होते, ते बदलण्यात आले. त्यानंतर ही मालगाडी पुढे रवाना करण्यात आली.
-सुधाकर जाधव, स्टेशन प्रबंधक, पाचोरा रेल्वे स्टेशन
इन्फो :
गाड्यांच्या खोळंब्यामुळे प्रवाशांचा गोंधळ
या घटनेमुळे जळगावहून मुंबईकडे जाणारी कर्नाटक एक्स्प्रेस ही जळगाव रेल्वेस्टेशनवर, तर गीतांजली एक्स्प्रेस भुसावळ रेल्वेस्टेशनवरच थांबविण्यात आली. मात्र, कर्नाटक एक्स्प्रेस जळगावला थांबली असताना, गाडीतील बहुतांश प्रवासी खाली उतरून एकमेकांशी मजाक-मस्तरी व गोंधळ घालताना दिसून आले. यावेळी काही प्रवासी विरुद्ध दिशेने रेल्वे लाइन ओलांडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरताना दिसून आले. विशेष म्हणजे विरुद्ध दिशेने गाडी येत असतानाही काही प्रवासी जीव धोक्यात, रेल्वे ओलांडत होते. या प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाचे जवान दिलीप बारी यांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन चांगलेच खडसावले.