डिगंबर महालेअमळनेर, जि.जळगाव : जननी, जन्मभूमी स्वर्गापेक्षा महान वाटणाऱ्यांपैकीच असलेले हल्ली मेलबर्न (आॅस्ट्रेलिया) येथे गेल्या १० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भूषण व डॉ.दर्पण शिदीड या बंधूंनी व त्यांचे स्नेही मूळ अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी प्रसाद पाटील यांनी अमळनेरच्या यात्रोत्सवातील रथाची हुबेहूब प्रतिकृती तयार करून जणू आपल्या जन्मभूमीतील भाविकांना श्रद्धा पूर्वक अपूर्व भेट दिली आहे.मातृभूमी सोडली तरी आपल्या मातीचा सुगंध सर्वत्र दरवळत ठेवणाºया या सुपुत्रानी यानिमित्ताने यंदा रथोत्सव होत नसल्याची खंत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.ही मंडळी खान्देशातील सण-वार, उत्सव आदी आवर्जून साजरे करतात. अमळनेरात असताना त्यांनी अनुभवलेला संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सवाची त्यांच्या मन:पटलावर अतूट छाप कायम राहिली आहे. त्यातूनच सखाराम महाराज यात्रोत्सवातील रथ बनविण्याच्या इच्छेने या त्रिकुटाच्या मनात मूळ धरले. रथाची प्रतिकृती साकारण्यासाठी थ्रीडी प्रिटिंंग क्षेत्रात संशोधन करीत असलेल्या डॉ. दर्पण यांनी त्यांना अवगत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला.मेलबर्न येथील नामांकित विद्यापीठातून पीएचडी ही पदवी मिळविल्यानंतर डॉ.दर्पण हल्ली कॅन्सर पीडित लोकांसाठी वापरता येईल अशा अवयव रोपणावर सध्या संशोधन करत आहेत. थ्री डी प्रिंटिंगच्या क्षेत्रात त्यांचे काही पेटंट्सदेखील आहेत. त्यांचे संशोधन आणि समीक्षात्मक लेख आणि प्रबंध नेहमी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रकाशित होत असतात. भारतीय संस्कृती प्रतिबिंबित करणाºया अनेक वस्तू डॉ. दर्पण थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून बनवत असतात. पर्यावरण पूरक असलेल्या या वस्तू ते भारतीय संस्कृती या नावाने भारतीय समुदायास उपलब्ध करून देतात. यातून ते छंद आणि संस्कृतीचीही जोपासना करतात.थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून श्री संत सखाराम महाराज यांच्या रथाचा आराखडा डॉ. श्री. दर्पण यांनी तयार केला. त्यासाठी नमुना दाखल त्यांनी मूळ रथाची अनेक छायाचित्रे आणि चित्रफिती पाहून संगणकावर रथाची रचना तयार केली. रथाच्या विविध भागांचे प्रमाण आणि मोज-माप याकडे खास लक्ष दिले. रथ पर्यावरण पूरक हवा म्हणून त्यात मक्याच्या कणसातील स्टार्चचा वापर केला. त्यासाठी जवळपास दोन आठवडे लागले.या वर्षी सखाराम महाराजांचा रथ अमळनेर येथून जरी निघणार नसला तरी तो मेलबर्नमधील अमळनेरकरांच्या हृदयमार्गावर नक्की धावेल, हे निश्चित.
अमळनेरच्या मूळ रथाच्या प्रतिकृतीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 9:51 PM
प्रसाद पाटील यांनी अमळनेरच्या यात्रोत्सवातील रथाची हुबेहूब प्रतिकृती तयार करून जणू आपल्या जन्मभूमीतील भाविकांना श्रद्धा पूर्वक अपूर्व भेट दिली आहे.
ठळक मुद्देमेलबर्नला राहणाऱ्या अमळनेरकरांचा असाही रथोत्सवथ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून संत सखाराम महाराजांच्या रथाचा आराखडा