जळगाव : माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यासाठी २० टन ऑक्सिजनचा टँकर बुधवारी मागविला आहे. हा ऑक्सिजन आपत्कालीन स्थितीत वापरला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. त्यावर महाजन यांनी वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेत तातडीने ऑक्सिजनच्या टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली.
मंगळवारी हा टँकर दुपारी १ वाजता शहरात आला. यात द्रव स्वरूपातील २० टन ऑक्सिजन होता. गेल्या आठवड्यात त्यांनी एफडीएच्या आयुक्तांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यात पुरेसे रेमडेसिविर इंजेक्शन व अन्य औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याला मान्यता मिळाल्याने, रुग्णांना दिलासा मिळाला आहे. यानंतर, आता महाजन यांनी प्राणवायूच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचा साठा करण्यात येणार असून, जिल्ह्यात जिथे कुठे ऑक्सिजनची कमतरता भासेल, तिथे याचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.