जळगाव : राज्यात स्थापन झालेल्या तीन पक्षाच्या सरकारमध्ये कुणाचा कुणाला ताळमेळ नाही.‘अंधेरी नगरी, चौपट राजा’ अशी या सरकारची परिस्थिती असल्याची जहरी टीका भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे कृतज्ञता सत्कार सोहळा समारंभातील दरम्यान त्यांनी ही टीका केली.
महाजन म्हणाले की, "मला वाटतं अजून ही फक्त सुरुवात आहे. त्यामुळे आम्हाला अजून काय काय भोगावं लागेल. कारण तीन पक्षाचं असलेल्या या सरकारमध्ये कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. कोणाचं कुणाला काहीही माहिती नाही. मला कोणाबाबतही वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही. पण अंधेर नगरी चौपट राजा अशी परिस्थिती या सरकारची झाली आहे," अशी टीका महाजन यांनी यावेळी केली.
पुढील चार-सहा महिन्यात पहा आपल्याला काय-काय चित्र पाहायला मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल बोलून, त्यांच्याबद्दल कळवळा दाखवून काहीही होणार नाही. त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना वीज दिली पाहिजे, पाणी आहे पण वीज नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायच? असा प्रश्नही गिरीश महाजनांनी उपस्थितीत केला.