जळगाव : राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. जळगाव जिल्ह्यात मात्र कोरोनाचा वेगळाच ‘डिसिस’ दिसून येत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना दोन महिन्यांत तीन वेळा कोरोनाची बाधा झाली. खडसेंना पुन्हा-पुन्हा कोरोना होतो कसा, असा प्रश्न माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रकाराबाबत शास्त्रज्ञांमार्फत संशोधन करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत केल्याचे त्यांनी सांगितले.
जळगावात शनिवारी अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठ्याचे आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीवर सरकारकडून कारवाया होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खान्देशात दोन ते तीन हजारांवर कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही का, दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवनातून पाच ते सहा हजार लोकांची रॅली काढली. त्याबाबत सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शिवजयंतीत एखाद्या आमदाराने मास्क घातले नसेल, तर त्यांना याबद्दल लगेच जाब विचारण्यात येत आहे. यावरून सरकारचे पक्षपाती धोरण दिसून येत आहे. सरकारने जो मापदंड सर्व सामान्यांना लावला, तोच सरकारमधील मंत्र्यांनाही लागू करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.