जळगाव - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी गुरुवारी भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया यांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पण, त्यांची चौकशी केल्यानंतर काही वेळाने त्याला सोडण्यात आले आहे. याप्रकरणावरुन आता चांगलंच राजकारण रंगत आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.
आमदार गिरीश महाजन यांनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. एकासाठी एक न्याय आणि दुसऱ्यासाठी दुसरा का? असा सवाल महाजन यांनी विचारला. सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोलल्यास लगेच कारवाई होते, पण विरोधी पक्षनेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही. सोशल मीडियातून सत्ताधार्यांबाबत काही जरी बोलले तरी त्यांना अटक होते. तर विरोधकांबाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य करुनही काहीच कारवाई होत नसल्याची बाब ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका महाजन यांनी केली. भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सरकारांवर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याबाबत अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं होतं. त्याबद्दल बोलताना, सत्ताधाऱ्यांची भूमिका दुटप्पी असून म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण, काळ सोकावतो, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. तसेच, आज कोणी जात्यात आहे, तर उद्या कोणी सुपात आहे. त्यामुळे, याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही महाजन यांनी म्हटले. महाजन यांनी नाव न घेता गजारिया यांच्यावर होत असलेल्या कारवाईकडे लक्ष वेधले.
गजारिया यांच्या ट्विटमुळे वाद
गजारिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’ (#MarathiRabriDevi), असे म्हटले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला. याच प्रकरणात गुरुवारी गजारिया यांना ताब्यात घेत, त्यांचा जबाब नोंदविण्यात येत आहे. यावेळी त्यांच्या वकिलाने गजारिया यांच्या ट्विटचे समर्थन केले. तसेच, मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे म्हणून ट्विट करता कामा नये, असा कायदा नाही. हे ट्विट अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या चौकटीत राहून केले आहे.