लोकमत न्युज नेटवर्क
जळगाव : माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या समवेत आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे हे देखील होते. त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांच्याशी चर्चा केली.
भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना जिल्हा रुग्णालयात मंगळवारी तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी आमदार गिरीश महाजन हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत रुग्णालयात आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासोबत कोरोनाच्या जिल्ह्यातील सद्य परिस्थीतीबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील बेड मॅनेजमेंट, ऑक्सिजनचा पुरवठा यासह अनेक बाबींवर त्यांनी चर्चा केली. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना रुग्णांची सोय इतरत्र कुठे करता येईल का, याबाबत पर्यायांची माहिती देखील त्यांनी घेतली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक नसल्याने अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. त्यामुळे रुग्णांना अतिरिक्त जागा म्हणून मोडाडी येथील रुग्णालयाचा पर्याय उभा राहत आहेत. त्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ न देता त्यांना वेळेवर उपाययोजना करून देण्याच्या सुचना देखील महाजन यांनी दिल्या. तसेच त्याबाबत वरिष्ठ पातळीवरून मदत लागल्यास ती देखील मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार चव्हाण यांची घेतली भेट
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना वीज कंपनीच्या अभियंत्याला मारहाण केल्या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यात त्यांची आज वैद्यकीय तपासणी होणार होती. त्यावेळी त्यांची भेट घेऊन विचारपुस करण्यासाठी महाजन हे रुग्णालयात आले होते. यावेळी माजी महापौर भारती सोनवणे, कैलास सोनवणे देखील उपस्थित होते.