अमळनेर : राज्याच्या अर्थसंकल्पात पाडळसरे धरणाला तुटपुंजा निधी दिल्याने अमळनेर तालुक्याच्या जनतेवर अन्याय झाल्याचे सांगत याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी अमळनेर येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे पोस्टर जाळण्यात आले.पाडळसरे धरणाला निधी कमी पडू देणार नाही असे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले होते. तसेच जलहक्क समितीच्या मोर्चावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भ्रमणध्वनीद्वारे सांगितले होते की, २३०० कोटी रुपये निधी तात्काळ उपलब्ध करून देतो आणि धरणाचे काम पूर्ण करू. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात धरणासाठी मंजूर करण्यात आलेला निधी पाहता त्यांच्या घोषणा फोल ठरल्या व धरण होईल या जनतेच्या आशा मावळल्या. याचा संताप व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी उतरावे लागले, असे सांगत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गिरीश महाजन यांचे पोस्टर जाळण्यात आले.यावेळी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील व संजय पूनाजी पाटील यांनी सांगितले की, शासनाला येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनता जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शासन, स्थानिक दोन्ही निष्क्रिय आमदारांचा निषेध करीत असल्याचेही नमूद केले.पाडळसरे जल हक्क समितीतर्फे २ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या जेलभरो आंदोलनात सहभागी होऊन व पाठिंबा देण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धरण जनआंदोलनाला भेट दिली व त्याठिकाणी आमदार, खासदारांविरुद्ध अहिराणी भाषेत घोषणाबाजी केली.तिलोत्तमा पाटील, शिवाजीराव पाटील तालुकाध्यक्ष सचिन पाटील, विधान क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, संजय पूनाजी, प.स सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागूल, योजना पाटील, आशा चावरीया, अलका पवार, हिम्मत पाटील, युवक शहराध्यक्ष बाळू पाटील, हर्षल पाटील, गौरव पाटील, गुलाब पिंजारी, अबिद मिस्तरी, सुभाष बापू, रणजीत पाटील, भैय्यासाहेब पाटील, नीलेश देशमुख, अरुण पाटील, इमरान खाटीक, सुनील शिंपी, कर्तारसिंग, राहुल गोत्राळ, नरेंद्र पाटील, संभाजी पाटील, वसीम पठाण, बाळा शेख, सोनू पाटील, संभाजी पाटील, महेश पाटील, सुनील पाटील, गजेंद्र पाटील, संजय पाटील, श्याम पाटील, सनी गायकवाड हजर होते.
अमळनेर येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे पोस्टर जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 4:20 PM