न्यायालय : तीन लाखांचा दंडही ठोठावला
जळगाव : जळगाव शहरातील २० वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. यातून ती गर्भवती व नंतर बाळाला जन्म दिला. लग्नास नकार दिला. याप्रकरणातील आरोपी जयकुमार अशोक सोनवणे (वय ३२, रा. खोटेनगर) याला बुधवारी जिल्हा न्यायालयाने दोषी धरुन १० वर्षे सक्तमजुरी व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत सविस्तर घटना अशी की, जयकुमार याने २०११-१२ मध्ये शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका तरुणीशी जवळीक साधली. यानंतर २०१३-१४ मध्ये प्रेमसंबंध प्रस्तापित करुन या तरुणीशी शरीरसंबंध ठेवले. तिला घरी, लॉजवर नेऊन अत्याचार केले. यातून तरुणी गर्भवती राहिली होती. तिने जयकुमार याला लग्न करण्यासाठी विनवण्या केल्या. परंतु, त्याने लग्न केले नाही. अखेर २०१५ मध्ये या तरुणीने जयकुमारच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जयकुमार याला अटक केली. दोन महिने कारागृहात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. दरम्यान, शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलेे. न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.
पीडितेची डीएनए चाचणी ठरली महत्त्वाची
या खटल्यात सरकारपक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. यात स्वत: पीडित तरुणीचा जबाब महत्त्वाचा ठरला. तसेच पीडिता व जयकुमार यांची डीएनए चाचणी देखील उपयोगात आली. सुनावणीअंती न्यायालयाने जयकुमार याला दोषी धरुन १० वर्षे सक्तमजुरी व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.उपनिरीक्षक विजयमाला चव्हाण व वासुदेव मराठे यांनी तपास केला. पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.
२०१६ मध्ये दिला मुलास जन्म
या पीडितेने सन २०१६ मध्ये मुलास जन्म दिला आहे. हा मुलगा आता पाच वर्षांचा आहे. जयकुमार याने पीडितेशी लग्न न केल्यामुळे तिने मुलाचा सांभाळ केला आहे. दरम्यान, न्यायालयाने जयकुमार याला ठोठावलेली तीन लाख रुपयांची दंडाची रक्कम पीडिता व तिच्या मुलास संगोपनासाठी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.